सावंतवाडीत सध्या सुरू असलेले पक्ष प्रवेश म्हणजे शहरवासीयांना केवळ मनोरंजन…

रवी जाधव:राजकीय संघर्षामध्ये शहरातील गंभीर प्रश्नांकडे कोणीही गांभीर्याने लक्ष देत नाही..

⚡सावंतवाडी, ता.२५-:
सावंतवाडीत सध्या सुरू असलेल्या जोरदार पक्ष प्रवेशांच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय भूकंप झाल्याची चर्चा रंगली आहे. या घडामोडींमुळे सर्वसामान्य जनता हादरल्याचे चित्र दिसत असले, तरी या सर्व राजकीय हालचालींना शहरवासीय केवळ मनोरंजनाचा विषय म्हणून पाहत असल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी केली आहे.

ते म्हणाले की, “मी मोठा की तू मोठा या राजकीय संघर्षामध्ये शहरातील गंभीर प्रश्नांकडे कोणीही गांभीर्याने लक्ष देत नाही, हीच सध्याची वस्तुस्थिती आहे. दररोज होणारे पक्ष प्रवेश आणि त्यामुळे होणारा ‘राजकीय भूकंप’ हे केवळ सत्तेच्या समीकरणांचे खेळ आहेत. मात्र, या सर्वाचा फायदा सर्वसामान्य जनतेला काय, हा खरा प्रश्न आहे,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

जाधव पुढे म्हणाले की, “सावंतवाडीतील नागरिक गेल्या चार वर्षांपासून रस्ते, पाणी, वीज, स्वच्छता, डास, सांडपाणी अशा आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांमुळे त्रस्त आहेत. या कालावधीत या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देणारे लोकप्रतिनिधी फारच कमी आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत नागरिकच खरा ‘भूकंप’ घडवून आणतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

त्यांनी पुढे सांगितले की, सावंतवाडी शहरातील जनता सुज्ञ आणि सजग असून, त्यांनी योग्य नेत्यांची निवड केली तरच शहरातील विकासाच्या प्रश्नांना प्राधान्य मिळेल. येणाऱ्या निवडणुकीत जनतेच्या मतांमधून या सुज्ञतेचा प्रत्यय येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page