ठेकेदाराचे निकृष्ट काम उघड..
⚡बांदा ता.२४-:
रोणापाल – देऊळवाडी येथे निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मुसळधार पावसात वीजेचा पोल मांगरावर पडून नुकसान झाले. दरम्यान रस्त्यावर वाहतूक नसल्याने मोठा अनर्थ टळला. ठेकेदाराच्या दर्जाहीन कामामुळे तसेच महावितरण अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सदर दुर्घटना घडल्याचा आरोप रोणापाल माजी सरपंच उदय देऊलकर यांनी केला आहे.
रोणापाल परिसराला आज मुसळधार पावसाने झोडपले. रोणापाल – देऊळवाडी येथे देऊलकर कुटुंबीयांच्या घरासमोरील वीजेचा खांब कोसळून तो मांगरावर पडल्याने मांगराच्या छप्पराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मांगरात कापणी केलेले भातही भिजल्याने भाताचे नुकसान झाले.
बांदा सहाय्यक अभियंता रघुनाथ ठाकूर यांना स्थानिकांनी जाब विचारला. महावितरण अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच सदर दुर्घटना घडल्याचा आरोपही स्थानिक ग्रामस्थांनी केला. सदर वीजेचा पोल योग्य प्रमाणात जमिनीत पुरलेला नव्हता. याबाबत उदय देऊलकर यांनी संबंधित ठेकेदाराला पूर्व कल्पना दिली होती. मात्र, ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याने आज सदर दुर्घटना घडली, असा आरोप माजी सरपंच सुरेश गावडे यांनी केला.
वीज पोल कोसळल्यानंतर वीज पुरवठा बंद करण्यासाठी अधिकारी व वीज कर्मचारी यांना फोन केला असता तो रिसिव्ह केला नसल्याचे उदय देऊलकर यांनी सांगितले. अशावेळी दुर्घटना झाली तर जबाबदार कोण असा सवालही त्यांनी उपस्थित केला. असा प्रकार महावितरण अधिकाऱ्यांकडून वारंवार होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
