शेतकऱ्यांचा संयम सुटला, वनविभागाविरोधात आंदोलन..
⚡बांदा ता.२१-:
मडुरा, कास, सातोसे परिसरातील शेतकऱ्यांचा संयम अखेर तुटला आहे. गेल्या वीस-पंचवीस दिवसांपासून ‘ओमकार’ हत्ती या भागात दहशत माजवत आहे. शेतकऱ्यांची उभी पिके उद्ध्वस्त झाली, भात कापणी थांबली आणि मिरची पिकाची पेरणीसुद्धा ठप्प झाली. तरीही वनविभाग मात्र “अधिकारी रजेवर आहेत” असे सांगत हात झटकताना दिसतो. परिणामी, शेतकरी संतापले असून अखेर त्यांनी सुरू केलेले उपोषण आंदोलन वनविभागाच्या आश्वासनावर तात्पुरते स्थगित केले आहे.
वनविभागाचे अधिकारी पृथ्वीराज प्रताप यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या वरिष्ठांकडे मेलद्वारे पाठवण्याचे आश्वासन दिले. मात्र शेतकरी म्हणाले की, हत्तीचा उपद्रव थांबवणार कोण? आणि आमच्या नुकसानीची भरपाई देणार कोण? हे अजूनही अनुत्तरितच आहे. आंदोलन थांबवण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत हत्तीला पकडणार आहोत” असे सांगितले असले तरी शेतकऱ्यांचा विश्वास आता डळमळीत झाला आहे.
रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे म्हणाले की, हत्तीच्या भीतीने शेतात कोणी मजूर कामाला येत नाहीत. उभे पिक शेतातच गळत आहे. काही गावांमध्ये भात कापणी ५० टक्क्यांहून अधिक झाली असताना मडुरा, सातोसे, कास या भागात शेतकरी शेतात उतरण्याचीही हिंमत करत नाहीत. रब्बी हंगाम सुरू होण्याआधी मिरची पेरणीचे काम व्हायला हवे होते, मात्र हत्तीच्या दहशतीने तेही थांबले आहे.
मडुरा माजी उपसरपंच विजय वालावलकर यांनी संतप्तपणे सांगितले, हत्तीला खाण्यासाठी जो निधी वापरला जातो, त्याचा उपयोग करून या भागातच हत्तीला अन्न द्या. निदान आमच्या पिकांचे नुकसान तरी थांबेल.
सातोसे माजी सरपंच आबा धुरी यांनी सवाल उपस्थित केला की, वनविभाग भात कापणीवेळी शेतकऱ्यांना संरक्षण देईल म्हणतो, पण हत्ती आला तर मजुरांना द्यावी लागणाऱ्या मजुरीची जबाबदारी कोण घेणार?
यावेळी कास सरपंच प्रवीण पंडित, मडुरा सरपंच उदय चिंदरकर, सातोसे माजी सरपंच आबा धुरी, रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, कास तंटामुक्ती अध्यक्ष बाबू पंडित, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर नाटेकर, मडुरा उपसरपंच बाळू गावडे, माजी उपसरपंच विजय वालावलकर, पोलिस पाटील नितीन नाईक, सातोसे ग्रामपंचायत सदस्य बाबू पंडित तसेच उल्हास परब, मंदार वालावलकर, नकुल परब, प्रकाश सातार्डेकर, प्रकाश वालावलकर, अरुण परब, आनंद पुनाळेकर, नारायण पंडित, पांडुरंग पंडित, समीर किनळेकर, गुणो किनळेकर, समीर पंडित, शामू पंडित, गोपाळ पंडित, शशिकांत पंडित, रुपेश राणे, प्रसाद राणे, शांताराम राणे, ताता अमरे, भाऊ भगत, प्रसाद मांजरेकर आदी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
