सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अखेर फिजिशियनची नेमणूक…

अँड अनिल निरवडेकर यांचा पुढाकार: तर भाजप युवा नेते विशाल परब व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच सहकार्य..

⚡सावंतवाडी ता.१९-: सावंतवाडीकर जनतेने आरोग्य सेवेत स्वयंसहाय्याचा आदर्श घालून दिला आहे. सामाजिक कार्यकर्ते ॲड. अनिल निरवडेकर यांच्या पुढाकाराला भाजपा युवा नेते विशाल परब आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्याने यश मिळाले असून, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अखेर फिजिशियन डॉक्टरची नेमणूक झाली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी डॉक्टर शंतनू तेंडुलकर यांच्या तात्पुरत्या नेमणुकीबद्दल अधिकृत पत्र दिले आहे.

गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात फिजिशियनची कमतरता असल्याने रुग्णसेवेवर ताण निर्माण झाला होता. मर्यादित मनुष्यबळावर डॉक्टर आणि कर्मचारी अतिरिक्त जबाबदारी पार पाडत होते. गोरगरीब रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याने स्थानिकांमध्ये असंतोष होता. या पार्श्वभूमीवर स्थायी उपाय म्हणून अनिल निरवडेकर यांनी “जनतेकडून जनतेसाठी” निधी उभारण्याची संकल्पना पुढे मांडली.

या उपक्रमाला स्थानिक संस्था, दानशूर नागरिक तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि युवा नेते विशाल परब यांचा सक्रिय पाठिंबा मिळाला. या निधीतून रुग्णालयातील फिजिशियन आणि नर्स यांच्या एका वर्षाच्या मानधनाची तरतूद शक्य झाली आहे.डॉ. शंतनू तेंडुलकर यांनी मानधनापेक्षा जनसेवा हेच आपले उद्दिष्ट असल्याचे सांगून ही जबाबदारी स्वीकारली आहे.

You cannot copy content of this page