विकास निधीचे ‘क्रेडिट’ नारायण राणे आणि प्रभाकर सावंत यांनाच…

बाबा मोंडकर:मंजूर झालेल्या कामांची प्रक्रिया पालकमंत्री नितेश राणे स्थानिक तालुकाध्यक्ष यांच्या माध्यमातून..

⚡मालवण ता.०६-:
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांचे योगदान आणि स्थानिक जनतेच्या पाठिंब्यामुळे केंद्रात आणि राज्यात सरकार आले जनतेला अपेक्षित असलेला विकास साधण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना सन्मान देण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा नियोजन मधून सुमारे १४ कोटी रुपयांपेक्षा जास्त विकास निधी मालवण तालुक्यासाठी मंजूर झाल्याबद्दल श्री. राणे यांचा भाजप मालवण तालुका कार्यकारिणीतर्फे अभिनंदन ठराव घेण्यात आला, अशी माहिती भाजपचे मालवण शहराध्यक्ष बाबा मोंडकर यांनी पत्रकार परिषदेत देतानाच या निधी व कामांचे श्रेय मित्रपक्षांकडून घेतले जात असले तरी हा विकास निधी आणण्याचे श्रेय हे खासदार नारायण राणे व जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनाच जात असल्याचेही श्री. मोंडकर यांनी स्पष्ट केले.

मालवण येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी सुदेश आचरेकर, गणेश कुशे, बाबा परब, मंदार केणी, यतीन खोत, आबा हडकर, सचिन आंबेरकर, जीवन भोगावकर, पंकज सादये, ललित चव्हाण, मिलिंद झाड, श्याम झाड, रवींद्र टेंबुलकर, अन्वेशा आचरेकर, सेजल परब, पूजा करलकर, राणी पराडकर, सौ.टेंबुलकर यांच्यासह अन्य भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बाबा मोंडकर म्हणाले, पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मधून मालवण तालुक्यासाठी १४ कोटींपेक्षा जास्त थेट निधी प्राप्त झाला आहे. यामध्ये मालवण शहर आणि वायरी भूतनाथ जिल्हा परिषद गट या गटासाठी पहिल्या टप्प्यात ४ कोटी ७० लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. मंजूर झालेल्या कामांची प्रक्रिया पालकमंत्री नितेश राणे स्थानिक तालुकाध्यक्ष यांच्या माध्यमातून जिल्हाध्यक्षांना सूचना देऊन आणि त्यांच्यामार्फत पालकमंत्र्यांनी मंजूर करण्याची होती. त्यामुळे या सर्व विकास कामांचे १०० टक्के श्रेय हे खासदार नारायण राणे आणि जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनाच जाते. कारण ही सर्व कामे त्यांच्या सूचनेनुसारच मंजूर झाली आहेत. या कामांचे श्रेय मित्र पक्षांकडून घेतले जात असले तरी या कामांचे प्रस्ताव भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सुचवल्यानुसारच करण्यात आले होते. याबाबतचे पुरावेही श्री. मोंडकर यांनी सादर केले.

जिल्हा नियोजन मधून प्राप्त झालेल्या निधीमध्ये मालवण शहरासाठी पहिल्या टप्प्यात नगरोत्थानमधून दोन कोटी ६५ लाख रुपये इतका भरीव विकास निधी प्राप्त झाला आहे. यामध्ये शहराची पर्यटनाची ओळख अजून दृढ व्हावी यासाठी पर्यटन पूरक प्रवेशद्वार उभारण्यासाठी १५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. शहरात रिक्षा व्यवसायाचे पर्यटनातील योगदान लक्षात घेऊन केरळ, कर्नाटकच्या धर्तीवर पर्यटन पूरक रिक्षा स्टॅन्ड बनवण्यासाठी १० लाख रुपये मंजूर झाले आहेत. पर्यटन पूरक लाईट व्यवस्था अधिक सुधारण्यासाठी ७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. शहरातील देऊळवाडा पूल येथे आकर्षक पद्धतीचे रेलिंग बसवण्यासाठी ७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. दलित वस्तीतील नागरिकांच्या मागणीनुसार व्यायाम शाळा उभारण्यासाठी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. शहरातील नादुरुस्त गटार व्यवस्था आणि काही करविंग पॉईंट्स विकसित करण्यासाठी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. वायरी भूतनाथ जिल्हा परिषद गटामध्ये पर्यटन आणि मच्छीमार समाजासाठी विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यात वायरी समुद्रकिनाऱ्यावरील मोरेश्वर देवस्थानाकडे पर्यटन पूरक सुविधा निर्माण करण्यासाठी आणि मच्छीमारांसाठी जेटी बांधण्यासाठी २२ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. जाधव वाडी रामदास मठ रेवंडकर पानंद येथील मासळी वाहतुकीसाठी रस्ता बनवण्यास २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. निशानकाठी येथे पर्यटन पूरक विकास करण्यासाठी ७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तारकर्ली बंदर जेटीवर खाडी किनारा भाग सावंतवाडी तलावासारखा विकसित करण्यासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मच्छीमारांच्या मागणीनुसार निवारा शेड उभारण्यासाठी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
केंद्रात आणि राज्यात असलेले भाजप सरकार १०० टक्के मालवणच्या नागरिकांसोबत आहे. येत्या काळात पर्यटन आणि मच्छिमार विकास क्षेत्रांमध्ये मालवणला अजून भरीव निधी मिळेल, अशी अपेक्षाही श्री. मोंडकर यांनी यावेळी व्यक्त केली.

You cannot copy content of this page