⚡मालवण ता.२९-: मालवण तालुका शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्राहक सहकारी संस्था लि. मालवण संचलित मालवणी बझारची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी स. का. पाटील सिंधुदूर्ग कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात संस्थेचे अध्यक्ष श्री. पी. एल. मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या विकासात्मक व धोरणात्मक चर्चेने संपन्न झाली.
यावेळी संस्थेतर्फे कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा आदर्श कामगार पुरस्कार कर्मचारी सौ. राधा कृष्णा पुजारे यांना संस्था अध्यक्ष श्री. पी. एल. मोहिते यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ व रक्कम रु.५०००/- देऊन सौ. पुजारे यांना गौरविण्यात आले. तसेच सभेमध्ये सभासदांच्या गुणवंत मुलांचा संस्था अध्यक्ष श्री. माहिते व संचालक मंडळ, सदस्य, सभासद यांचे हस्ते भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला.
सभेमध्ये विषयपत्रिकेप्रमाणे मागील सभेच्या इतिवृत्तासह आर्थिक पत्रकांना मंजूरी, १० टक्के लाभांश, शासकीय लेखापरिक्षण अहवाल नोंद, विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. संस्थेला प्रगती पथावर नेण्यासाठी खेळते भांडवल वाढीसाठी उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच सभासद ग्राहकांना सर्व प्रकारचा दर्जेदार माल, माफक दर, विनम्र सेवा देण्यासाठी संस्थेचे संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. संस्थेच्या स्व:मालकीच्या जागेतील इमारतीचे बांधकाम करून विक्री व्यवसाय वाढ करण्याच्या दृष्टीने विकासात्मक धोरण अवलंब करण्याचा संस्थेच्या संचालक मंडळाचा मानस आहे. या इमारतीमध्ये मालवणी बझारचा भव्यदिव्य मॉल, व्यापारी गाळे, पर्यटन निवास व्यवस्था, कार्यालयासाठी भाडे तत्वावर जागा उपलब्ध करून देणे, बहुउद्देशीय हॉल आदी सेवा सुविधांनी परिपूर्ण इमारत उभारण्याचा विचार आहे, असे अध्यक्ष श्री. मोहिते यांनी सांगत त्यादृष्टीने नियोजनात्मक अभ्यास व चर्चा चालू असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे संस्थेच्या भागभांडवलात वाढ होणेसाठी सभासदांनी जास्तीत जास्त भाग खरेदी करावे तसेच संस्थेच्या ग्राहकठेव, मुदतठेव योजनेत गुंतवणूक करण्याचे आवाहन अध्यक्ष श्री. मोहिते यांनी करत उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
या सभेस संस्थेचे अध्यक्ष श्री. पी. एल. मोहिते, उपाध्यक्ष श्री. एम. आर. सोनवडेकर, संचालक श्री. पी. एस. बागवे, श्री. एस. डी. तळवडेकर, श्री. व्हि. एस. सातार्डेकर, श्री. एस. एम. गवंडी, श्री. जी. एम. कोकरे, श्री. एम. व्हि. परब, श्री. पी. आर. पारकर, श्री. आर. आर. खोबरेकर, श्री. एच. जी. प्रभू, श्री. एच. एस. तळवडेकर, सौ. एस. के. गांवकर, सौ. जे. एस. हडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पी. व्ही. परब, अनेक मान्यवर सभासद, विद्यार्थी, कर्मचारी आदि उपस्थित होते.
