⚡मालवण,ता.२८-:
राजमाता जिजाऊ आणि दुर्गा मातेचे स्मरण करण्यासाठी शहरात ३० सप्टेंबर रोजी ‘दुर्गा माता दौड’ आयोजित करण्यात आली आहे. या दौडीला सकाळी ७.३० वाजता रामेश्वर कॉम्प्लेक्सजवळील दुर्गा मातेच्या मंदिरापासून सुरुवात होणार असून ती बंदर जेटी पर्यंत काढण्यात येणार आहे.
राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पोटात असताना नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करून देवीकडे ‘देव, देश आणि धर्माचे रक्षण’ करणाऱ्या बालकाला जन्म देण्याचे साकडे घातले होते. दुर्गा मातेने जिजाऊंची ही इच्छा पूर्ण केली आणि याच कारणामुळे छत्रपती शिवरायांमुळे आपण आज हिंदू म्हणून आपले धार्मिक कार्यक्रम साजरे करू शकतो.
या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी दौडमध्ये मालवणमधील सर्व स्त्री-पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन स्वराज्य संघटना आणि सकल हिंदू समाज यांनी केले आहे. या दौडमध्ये सहभागी होणाऱ्यांनी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावेत आणि भगव्या रंगाची शाल किंवा ओढणी वापरावी, असे संयोजकांनी कळवले आहे.
