⚡मालवण ता.२१-:
मालवण तालुक्यातील आचरा येथील ज्येष्ठ साहित्यिक व कोकण मराठी साहित्य परिषदेचे मालवण अध्यक्ष सुरेश शामराव ठाकूर यांनी संपादीत केलेल्या व कोमसाप मालवणच्या १८ ललित लेखकांनी साकारलेल्या ‘बिज अंकुरे अंकुरे’ या पुस्तकाला कोमसापचा संपादनाचा पहिला केंद्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण दि. ८ नोव्हेंबर रोजी रत्नागिरी येथील मालगुंड येथे होणार आहे.
‘बिज अंकुरे अंकुरे’ सदर पुस्तकात कोमसाप मालवणच्या अनुक्रमे रश्मी रामचंद्र आंगणे, वर्षाराणी बलवंत अभ्यंकर, पूर्वा मनोज खाडीलकर, तेजल गुरुनाथ ताम्हणकर, ऋतुजा राजेंद्र केळकर, आदिती धोंडी मसूरकर, शिवराज विठ्ठल सावंत, मधुरा महेश माणगावकर, रसिका राजेंद्र तेंडोलकर, दिव्या दीपक परब, वंदना नारायण राणे, देवयानी त्रिंबक आजगावकर, विठ्ठल लक्ष्मण लाकम, वैजयंती विद्याधर करंदीकर, नारायण यशवंत धुरी, सदानंद मनोहर कांबळी, अशोक कांबळी, गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर या १८ लेखकांनी आपले १४६ ललित लेख शब्दबद्ध केले असून सदर पुस्तक ‘सत्त्वश्री प्रकाशन रत्नागिरी’ यांनी प्रकाशित केलेले आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ लेखक रविंद्र वराडकर यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली असून “१८ लेखकांच्या प्रतिभेचे नवोन्मेष साकारलेले हे १४६ ललित लेखांचे महाराष्ट्रातले पहिले पुस्तक आहे.” असा पुस्तकाचा गौरव त्यांनी केला आहे. तसेच ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनीही “सुरेश ठाकूर आणि संपादित केलेला हा ग्रंथ म्हणजे केवळ कोकणातच नव्हे तर महाराष्ट्राला अनुकरणीय ठरावा असाच आहे” असे कौतुकोद्गार काढले आहेत.
या पुरस्काराबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना सुरेश ठाकूर म्हणाले, “गेली सहा वर्षे अध्यक्ष म्हणून काम करत असताना मी सिंधुसाहित्यसरिता (चरित्र ग्रंथ), बीज अंकुरे अंकुरे (ललित लेख संग्रह), ये गं ये गं सरी (कविता संग्रह) या तीन पुस्तकांच्या माध्यमातून कोमसापच्या जवळ जवळ १०० लेखकांना मी लिहिते केले. यातच मला आनंद आहे. आज बीज अंकुरे अंकुरेचे जे कौतुक झाले, ते माझे स्वतःचे नसून कोमसाप मालवणच्या लेखक सदस्यांचे आहे. मी मात्र संपादक म्हणून निमित्त मात्र आहे, असेही ते म्हणाले. या पुरस्काराबद्दल सुरेश ठाकूर व त्यांच्या सहकारी लेखकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
