विविध उपक्रम व स्पर्धांचा समावेश..
⚡मालवण ता.२०-:
जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती, युवा टुरिझम क्लब आणि पर्यटन व्यावसायिक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत पर्यटन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यात २७ सप्टेंबर रोजी टुरिझम ३६०° : वारसा, संस्कृती, तंत्रज्ञान आणि शाश्वततेचा जागतिक प्रभावासाठी संगम या विषयावर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कृ. सि. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मालवण येथील कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ संचलित स. का. पाटील सिंधुदुर्ग कला, वाणिज्य आणि देशभक्त शंकरराव गवाणकर विज्ञान महाविद्यालय येथे आज पत्रकार परिषद झाली. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, ऍड. समीर गवाणकर, बॅ. नाथ पै सेवांगणचे कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती अध्यक्ष गुरुनाथ राणे, पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, प्रा. डॉ. सुमेधा नाईक, दर्शन वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.
प्रथम पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झाल्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटन व्यवसाय उत्तमरीत्या आकाराला आला आहे. उद्योग आणि शिक्षण संस्था यांचा मेळ साधून जिल्ह्यातील पर्यटन उद्योग वाढीस लागावा. त्यामध्ये धोरणात्मक योगदान देता यावे. विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा. त्यांना रोजगार संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच विद्यार्थी आणि समाजामध्ये शाश्वत व जबाबदार पर्यटन व्यवसाय विषयी जागृती निर्माण व्हावी. याबाबत अधिकाधिक संवाद वाढीस लागावा. या उद्देशाने जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून पर्यटन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या पर्यटन सप्ताहाचा आणि राष्ट्रीय परिसंवादाचा उद्घाटन सोहळा २६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता महाविद्यालयाच्या नरहरी झांटये सभागृहात होणार आहे. उद्घाटन सोहळ्यास राजस्थान विद्यापीठातील प्राध्यापिका आणि प्रसिद्ध गायिका डॉ. अंशू वर्मा, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, तहसीलदार वर्षा झालटे यांच्यासह १२ राज्याचे प्रतिनिधी व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
या पर्यटन सप्ताहात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती प्रा. सुमेधा नाईक यांनी दिली. यामध्ये २७ रोजी चर्चासत्र, २८ रोजी जागतिक वारसा स्थळ किल्ले सिंधुदुर्गला भेट, २९ रोजी ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा, ३० रोजी विद्यार्थ्यांसाठी सेमिनार, १ ऑक्टोबर रोजी किल्ले वाळू शिल्प स्पर्धा, २ ऑक्टोबर रोजी स्वच्छता मोहीम, ३ रोजी विरांगना- भारतीय शूर स्त्री योद्धा वेशभूषा स्पर्धा अशा उपक्रमांचा समावेश असल्याचे प्रा. नाईक यांनी सांगितले. या कार्यक्रमात विद्यार्थी, पर्यटन व्यावसायिकांनी, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. साईनाथ चव्हाण यांनी केले आहे.
