⚡मालवण ता.२०-: असंघटित घरेलू कामगारांसाठी शासनाने शाश्वत योजना राबवून त्यांना आर्थिक बळकटी व सामाजिक सुरक्षितता द्यावी, या मागण्यांसाठी आज मालवण शहरात भारतीय मजदूर संघातर्फे घरेलू कामगार महिलांची भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.
भारतीय मजदूर संघातर्फे आज दुपारी मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात महिलांचा मेळावा घेऊन त्यानंतर शहरातून रॅली काढण्यात आली. मामा वरेरकर नाट्यगृह ते भरड नाका येथून बाजारपेठ मार्गे पुन्हा नाट्यगृह अशी ही रॅली काढण्यात आली. भारतीय मजदूर संघाचा विजय असो, घरेलू कामगार संघाचा विजय असो, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी भारतीय मजदूर संघांचे प्रदेश सचिव हरी चव्हाण, विभाग संघटन मंत्री भगवान साटम, जिल्हा सचिव हेमंतकुमार परब, जिल्हा कोषाध्यक्ष ओंकार गुरव, तालुका प्रतिनिधी कल्पिता जोशी, जिल्हा प्रतिनिधी भाग्यश्री माळकर, तालुका प्रतिनिधी महेश सुर्वे आदी उपस्थित होते. या रॅलीसाठी ललित चव्हाण, निनाद बादेकर, शुभम लुडबे आदी उपस्थित होते.
यावेळी हेमंतकुमार परब यांनी प्रास्ताविक व स्वागत करत घरेलू कामगार महिलांच्या रॅलीच्या आयोजनामागील कारणे स्पष्ट केली. तर भगवान साटम यांनी मार्गदर्शन करत कामगारांमध्ये एकजूट महत्वाची असून ती कायम राहावी, असे सांगितले.
यावेळी हरी चव्हाण म्हणाले, घरेलू कामगार महिलांसाठी एखादी योजना राबविण्याबाबत शासनाकडून आजपर्यंत अनास्था दाखविण्यात आली आहे. कामगारांसाठी ठोस व शाश्वत अशा योजना शासनाने निर्माण केल्या पाहिजेत. मुलांचे शिक्षण, आरोग्य विमा, शरीर काम करत नसल्यास उदरनिर्वाह कसा करायचा, असे अनेक प्रश्न कामगारांसमोर आहेत. ६० वर्षावरील घरेलू कामगारांना पेन्शन योजना लागू झाली पाहिजे, कामगारांना सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत, असेही यावेळी हरी चव्हाण म्हणाले.
