⚡मालवण, ता.२०-:
मालवण येथील बाजारपेठेतील व्यापारी बबन तळवडेकर यांना रस्त्यात सापडलेले पैशाचे पाकीट त्यांनी ओळख पटवून मालकाला परत केले आहे. या घटनेमुळे मालवण व्यापारी संघाच्या सदस्याच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मालवण बाजारपेठ येथील व्यापारी बबन तळवडेकर यांना रस्त्यात एक पैशाचे पाकीट सापडले. त्यांनी ते उघडून पाहिले असता त्यात रोख रक्कम, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक एटीएम आणि क्रेडिट कार्ड असे महत्त्वाचे कागदपत्र होते. तळवडेकर यांनी पाकिटातील आधार कार्डच्या मदतीने त्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर त्यांना मुंबईहून मालवण परिसरात स्थायिक झालेले सेवानिवृत्त व्यक्ती सुनील कुमार यांचा शोध लागला.
तळवडेकर यांनी तात्काळ मालवण येथील ज्येष्ठ व्यापारी नानाशेठ पारकर, हेमंत शिरपुटे, जयू शिरपुटे, हर्षल बांदेकर, उमेश मयेकर आणि मयू पारकर यांच्या उपस्थितीत खात्री करून सुनील कुमार यांना त्यांचे हरवलेले पाकीट सुपूर्द केले. आपले हरवलेले पाकीट आणि त्यातील सर्व वस्तू सुरक्षित मिळाल्याने सुनील कुमार यांनी बबन तळवडेकर यांचे मनापासून आभार मानले.
बबन तळवडेकर यांच्या या निःस्वार्थ आणि प्रामाणिकपणाचे व्यापारी वर्गातून तसेच नागरिकांमधून कौतुक होत आहे. या घटनेमुळे येथील व्यापारी संघाची प्रामाणिकपणाची प्रतिमा अधिकच उजळली आहे.
