मनिष दळवी:अपयश पुढे येईल अशा प्रकारची भीती जर उद्धव सेनेच्या लोकांना वाटत असेल तर तो तुमचा दोष..
⚡वेंगुर्ला ता.१५-: वेंगुर्ला येथे झालेल्या जनता दरबारामध्ये ७० टक्के पेक्षा जास्त निवेदनांचे प्रश्न त्याचठिकाणी मार्गी लागले आहेत. उर्वरित काही प्रकरणात जी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे ती झाल्यानंतर पुढील १५ दिवसांत उर्वरित प्रकरणे मार्गी लागतील, अशी माहिती जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. ज्या नेत्याची प्रशासनावर स्वतःची पकड आहे तोच नेता अशाप्रकारे जनता दरबार घेऊ शकतो असेही सुतोवाच त्यांनी केले.
पालकमंत्र्यांनी घेतलेला जनता दरबार हा जनतेची दिशाभूल करण्यासाठीचा आहे अशी टिका उद्धव सेनेच्या पदाधिका-यांनी वेंगुर्ला येथे पत्रकार परिषद घेऊन केली होती. या टिकेला उत्तर देताना, जिल्हा बँक अध्यक्ष दळवी यांनी भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलताना म्हणाले की, उद्धव सेनेच्या पदाधिका-यांनी हे लक्षात ठेवावे की, सत्तास्थानाच्या काळात त्यांनी कधीही अशा प्रकारचा ना जिल्हास्तरावर कोणता जनता दरबार घेतला ना तालुकास्तरावर, ना गावपातळीवर घेतला. कारण जनता दरबार घेण्यासाठी जनतेमध्ये थेट जाऊन जनतेचे प्रश्न समजून घेऊन त्याला न्याय देण्यासाठी, संवाद करण्यासाठी हिम्मत असावी लागते, पारदर्शकता असावी लागते. प्रशासकीय बाब जर या टीका करणा-या लोकांच्या लक्षात येत नसेल की प्रशासकीय बाबींमध्ये निर्णय घेण्याचे अधिकार त्या त्या विभागाच्या अधिका-यांना असतात. पालकमंत्री यांनी निर्देश दिल्यानंतर त्या निवेदनावर कोणत्या प्रकारची कार्यवाही करणे अपेक्षित आहे किवा कोणती कार्यवाही करणार आहेत याची उत्तरे त्याठिकाणी समोरासमोर संबंधित अधिका-यांच्या माध्यमातून घेण्यात आली आहेत.
ज्या चांगल्या गोष्टी घडतात त्याला चांगलं म्हटलं पाहिजे चांगल्या गोष्टींना स्वीकारलं पाहिजे. जनतेचे प्रश्न सुटत असतील तर कोणाला वाईट वाटण्याचं करण नाही. आपले अपयश पुढे येईल अशा प्रकारची भीती जर उद्धव सेनेच्या लोकांना वाटत असेल तर तो तुमचा दोष आहे. या जनता दरबाराबद्दल सामान्य जनता समाधान व्यक्त करत आहे. या सर्वांच्या माध्यमातून लोकाभिमुख कारभार करण्याचा पालकमंत्री यांचा मानस असल्याचे दळवी म्हणाले. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष विष्णू परब, माजी मंडळ अध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा निमंत्रीत साई प्रसाद नाईक आदी उपस्थित होते.
फोटोओळी – मनिष दळवी यांनी वेंगुर्ला येथील पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली. सोबत प्रसन्ना देसाई, विष्णू परब व अन्य उपस्थित होते.
