जलजीवन आणि रस्ते कामांसाठी अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाहीचे आदेश..
⚡बांदा ता.२१-:
बांदा – सटमटवाडी येथील ग्रामस्थांनी स्थानिक समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाची दखल पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी घेतली आहे. जलजीवन पाईपलाईन, सर्व्हिस रस्त्यांच्या प्रश्नांवर तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत.
बांदा सटमटवाडीतील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून खराब सर्व्हिस रोडमुळे त्रस्त होते. विशेषतः, जलजीवन मिशन अंतर्गत टाकलेल्या पाईपलाईनला अनेक ठिकाणी लिकेज असल्याने पाण्याचा अपव्यय होत होता. पाणी बोगद्यात साचून राहत असल्याने रस्ते वाहतुकीस धोकादायक झाले होते. चिखलमय स्थितीमुळे शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांना ये-जा करताना मोठ्या अडचणी येत होत्या. याच प्रश्नांवर गावातील संघर्ष समिती आणि ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन सादर केले होते. समस्यांवर तोडगा न निघाल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशाराही दिला होता.
या समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले होते. त्यानुसार गुरुवारी दुपारी त्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या. संबंधित विभागाचे अधिकारी आणि ठेकेदारांना तातडीने दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत. गणेश चतुर्थी जवळ आल्याने खराब रस्त्यांमुळे गणपती मूर्ती आणताना होणाऱ्या गैरसोई कडे स्थानिकांनी लक्ष वेधले.
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी तसेच जलजीवन प्राधिकरणचे अधिकारी यांना संबंधित दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्याचे आदेश दिले. पालकमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे स्थानिक आणि समाधान व्यक्त केले.
यावेळी जिल्हा बँक संचालक मनीष दळवी, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच आबा धारगळकर, माजी सभापती शितल राऊळ, ग्रा. पं. सदस्य जावेद खतीब, माजी उप सरपंच बाळू सावंत, रत्नाकर आगलावे, प्रसाद पावसकर, संदीप बांदेकर, भाऊ वाळके, बाळा आकेरकर, गजानन गायतोंडे, शहर अध्यक्ष बाबा काणेकर, दोडामार्ग माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, शिवसेना पदाधिकारी गुरुनाथ सावंत, जीवबा वीर, आनंद वसकर, विठ्ठल केळुसकर, समीर सावंत, शुभम साळगावकर, उबाठा शहर प्रमुख साई काणेकर, रत्नमाला वीर, हुसेन मकानदार, सिद्धेश महाजन, दर्पण आळवे, साई सावंत, अक्षय परब, सचिन वीर, राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव, सहाय्यक कार्यकारी अभियंता वृषाली पाटील, ग्रामसेवक ए. एम. शहा, लिपीक संजय सावंत आदींसह सटमटवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
