कुडाळ येथे ‘फणस एकः व्यवसाय संधी अनेक’ या विषयावर कार्यशाळा संपन्न…

⚡मालवण ता.२९-:
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या प्रेरणेने व मातोश्री प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सौ. रश्मी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने कुडाळ येथील मराठा समाज भवन येथे “उद्योगावर बोलू काही… या ब्रीदवाक्याखाली “फणस एकः व्यवसाय संधी अनेक!” या विषयावरील पहिली निःशुल्क प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून उद्योग सुरु करू इच्छिणाऱ्या ५० ते ६० महिला पुरुष नवउद्योजकांनी कार्यशाळेचा लाभ घेतला.

या कार्यशाळेचा शुभारंभ शिवसेना नेते, सचिव तथा माजी खासदार श्री.विनायक राऊत यांच्या हस्ते झाला. ही कार्यशाळा घेण्यामागची भूमिका आणि मार्केटिंगच्या साखळीपर्यंतची माहिती शिवसेना उपनेत्या,माविमच्या माजी अध्यक्ष तथा या कार्यक्रमाच्या संकल्पक डॅा.सौ.ज्योती ठाकरे यांनी आपल्या प्रस्तावनेतून दिली. यंत्र उद्योजक तथा उत्कर्ष उद्योजक संस्थेचे अध्यक्ष श्री.गणेश भांबे यांनी फणस प्रक्रियेसंदर्भात प्रोजेक्टरद्वारे विस्तृत व तपशीलवार माहिती दिली. तर या उद्योगासाठी मदतरूप ठरणाऱ्या शासकिय योजना, कर्जप्रक्रियेचे प्रस्ताव व अनुदानाची परिपूर्ण माहिती MCED चे निवृत्त राज्यप्रमुख श्री.सुनिल देसाई यांनी दिली.

सहभागी प्रशिक्षणार्थीनी या उपक्रमाबाबत आपली मनोगते मांडून या उपक्रमाची गरज असल्याने प्रकर्षाने सांगत आयोजकांना धन्यवाद दिले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी माजी आमदार वैभव नाईक, संपर्क संघटक अपूर्वा प्रभू, जिल्हा युवाधिकारी श्री.मंदार शिरसाट, जिल्हासंघटक श्रेया परब यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यशाळेस उपस्थित राहिलेल्या नव उद्योजक महिला, तरुणांसाठी लवकरच पाठपुरावा सभा आयोजित करुन फणसावर आधारीत उदयोग घटकाच्या पुढील नियोजनासाठी कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. याच प्रकारची कार्यशाळा रत्नागिरी शहरातही संपन्न झाली.

You cannot copy content of this page