अमित इब्रामपूरकर यांचे अल्पशा आजाराने निधन…

⚡मालवण ता.२९-:
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष आणि मालवणमधील प्रसिद्ध सिव्हिल इंजिनियर अमित श्रीकृष्ण इब्रामपूरकर (वय ४३) यांचे अल्पशा आजाराने पडवे येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना अकाली निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

शासकीय ठेकेदार म्हणून काम करणाऱ्या अमित इब्रामपूरकर यांचे इंजिनियरिंग क्षेत्रात प्रभुत्व होते. मालवण तालुका सिव्हिल इंजिनियर असोसिएशनच्या सहखजिनदार पदावर ते कार्यरत होते. ते अविवाहित होते. आज सकाळी रेवतळे मालवण येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण, वहिनी, भावोजी, पुतणी, भाचे असा परिवार आहे. मालवण पंचायत समितीचे सेवानिवृत्त अधीक्षक श्रीकृष्ण इब्रामपूरकर यांचे ते सुपुत्र होत.

मालवण देऊळवाडा येथील रहिवासी असलेल्या अमित इब्रामपूरकर यांनी मालवण येथील डॉ. एस. एस. कुडाळकर हायस्कुल येथे दहावी पर्यंतचे तर अ. शि. दे. टोपीवाला हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयातून बारावी विज्ञान शाखेतून शिक्षण घेतले. त्यानंतर मालवणच्या शासकीय तंत्रनिकेतन मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेऊन पदवी घेतली. तंत्रनिकेतन मध्ये शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठविणारे अमित इब्रामपूरकर हे त्यावेळी शिवसेनेच्या भारतीय विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी बनले. अमित इब्रामपूरकर यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवितानाच अनेक आंदोलने उभारली. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केल्यानंतर राज ठाकरे यांनी अमित इब्रामपूरकर यांच्यावर मनविसेच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. इब्रामपूरकर यांनी मराठीच्या मुद्द्याबरोबरच परप्रांतीय फळविक्रेते, त्याकाळात मालवणात सुरु असलेल्या भुयारी गटार योजनेच्या नित्कृष्ट दर्जाच्या कामाबाबत स्पॉट पंचनामा करत नगरपालिका प्रशासनाला हादरवून सोडले होते. कोरोना काळातही त्यांनी रुग्णांना पक्षाच्या वतीने प्रसंगी स्व:खर्चाने सढळ हस्ते मदत करत सामाजिक बांधिलकी जोपासली.

You cannot copy content of this page