रोटरी आणि इनरव्हील क्लबचा संयुक्त उपक्रम:विजेत्यांना आकर्षक बक्षिसे..

⚡कणकवली ता.२९-: रोटरी आणि इनरव्हील क्लब कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी पाककला प्रशिक्षण व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत कॉलेज रोड येथील लक्ष्मी विष्णू हॉलमध्ये पाककला प्रशिक्षण होणार असून, त्यानंतर सायंकाळी ५ ते ६ या वेळेत पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या पाककला प्रशिक्षणामध्ये गव्हापासून बनविता येणारी बिस्किटे, प्रोटीन चॉकलेट बार, गुलाब जामुन केक यांसारखे नावीन्यपूर्ण पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. विविध पाककृतींची माहिती देण्याबरोबरच हे पदार्थ प्रत्यक्ष तयार करून दाखविण्यात येणार आहेत.
प्रशिक्षणानंतर होणाऱ्या पाककला स्पर्धेसाठी ‘आरोग्यदायी पौष्टिक दिवाळी फराळ – कोणताही एक पदार्थ’ हा विषय ठेवण्यात आला आहे. स्पर्धकांनी आपला पदार्थ घरी तयार करून आणायचा आहे. स्पर्धा संपल्यानंतर लगेचच पदार्थांचे परीक्षण करून विजेत्यांची निवड केली जाणार आहे.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला गॅस शेगडी, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्याला कुकर, तर तृतीय क्रमांकाच्या विजेत्याला इडलीमेकर देण्यात येणार आहे. तसेच एका स्पर्धकाला उत्तेजनार्थ बक्षीस दिले जाणार आहे.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर महिलांना आरोग्यदायी व नावीन्यपूर्ण पाककृती शिकण्याची आणि आपल्या पाककौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी या उपक्रमातून मिळणार आहे. या प्रशिक्षण व स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी दिशा अंधारी आणि राजश्री रावराणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन रोटरी क्लबच्या अध्यक्षा सुप्रिया नलावडे यांनी केले आहे.
