Headlines

बेळगाव येथील राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेत बाळकृष्ण पेडणेकर याने रेटिंग कॅटेगरीत पटकावला प्रथम क्रमांक…

⚡सावंतवाडी ता.२९-: बेळगाव, कर्नाटक येथील लायन्स क्लब आणि लिओ क्लबने आयोजित केलेल्या सात लाख पंचवीस हजार रुपये पारितोषिके असलेल्या पहिल्या राष्ट्रीय फिडे रॅपिड रेटिंग स्पर्धेत सावंतवाडीच्या बाळकृष्ण पेडणेकर याने दमदार कामगिरी केली. बाळकृष्णने रेटिंग कॅटेगरीत प्रथम क्रमांक पटकावला.

भारतातील विविध राज्यातील सुमारे तीनशे तीस खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन मुक्ताई ॲकेडमीचे आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर, चिदानंद रेडकर यांच्यासह प्रज्वल नार्वेकर आणि स्वरुप राऊळ या विदयार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळ केला.
बाळकृष्णला या स्पर्धेत दोन हजार पेक्षा अधिक रेटिंग असलेले चार स्पर्धक मिळाले. त्यापैकी आंतरराष्ट्रीय मास्टर सम्मेद शेटे, फिडे मास्टर निरंजन नवलगुंद यांच्याशी बाळकृष्णने चांगली लढत दिली. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय मास्टर निखिल दिक्षित याच्याविरुद्धचा सामना बरोबरीत सोडवला आणि केवल निर्गुण याचा पराभव केला. यापूर्वी बाळकृष्णने मुंबई येथील राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय महिला मास्टर पर्णाली धारीया हीचा पराभव करण्याचा पराक्रम केला. एका आंतरराष्ट्रीय मास्टरबरोबर डाव बरोबरीत सोडवणारा आणि एका आंतरराष्ट्रीय मास्टरचा पराभव करणारा बाळकृष्ण हा कोकणातील पहिला खेळाडू ठरला आहे.
बाळकृष्णने नऊ राऊंड्समध्ये सहा राऊंड्स जिंकून आणि एक राऊंड बरोबरीत सोडवून साडेसहा गुण केले आणि रेटिंग कॅटेगरीत पहिला क्रमांक पटकावला. त्याने अडतीस रेटिंग पाॅईंट्स मिळवले. बाळकृष्णला रोख रक्कम रु.दहा हजार, आकर्षक मेडल आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तेरा वर्षीय स्वरुप राऊळ याने दोन आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडूंवर विजय मिळवून पाच गुण केले. तेरा वर्षीय चिदानंद रेडकर याने चार गुण आणि नऊ वर्षाचा प्रज्वल नार्वेकर याने तीन गुण केले. ब्लिट्ज रेटिंग स्पर्धेत बाळकृष्णने सहा, चिदानंदने पाच, प्रज्वल आणि स्वरुपने चार गुण केले. चिदानंद, प्रज्वल आणि स्वरुप यांनी ब्लिट्ज रेटिंग मिळवले. मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ प्रशिक्षक श्री.कौस्तुभ पेडणेकर आणि सरचिटणीस सौ.स्नेहा पेडणेकर यांनी सर्व विदयार्थ्यांचे कौतुक करतानाच सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व स्तरातून विदयार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page