निलंबन प्रश्नावर महावितरण इंजिनिअर्सचे ठिय्या आंदोलन…

अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयात दिवसभर ठिय्या ; निर्णय नाही:उद्या पुन्हा सकाळी दहा वाजल्यापासून आंदोलन सुरु ठेवणार…

कुडाळ : महावितरण कंपनीच्या वेंगुर्ले येथील कार्यालयातील उप कार्यकारी अभियंता अंकुश कौरवार आणि वेंगुर्ले शहर सहाय्यक अभियंता सचिन उकंडे यांचे एकतर्फी व अन्यायकारक निलंबन केल्याच्या निषेधार्थ सबॉर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशनचे इंजिनीअर्स सोमवारी सकाळी कुडाळ येथील अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर एकवटले. सुरुवातीला कार्यालयासमोर आणि नंतर अधीक्षक अभियंता यांच्या दालनात जमिनीवर बसून या अभियंत्यांनी ठिय्या आंदोलन केले. सुमारे 40 ते 50 अभियंते या आंदोलनात सहभागी झाले होते. अन्यायकारक निलंबन तात्काळ मागे घ्या, अन्यथा आंदोलन चालूच ठेवणार अशी ठाम भूमिका संघटनेच्या पदाधिकारी व इंजिनियर्सनी घेतली. अधीक्षक अभियंता यांनी चार दिवसांची मुदत मागितली मात्र संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी ती नाकारत आम्हीच चार दिवस इथे बसतो असे सांगून प्रशासनाच्या चुकीच्या भूमिकेवर जोरदार हल्ला चढवला. सायंकाळी सव्वा सहा वाजता आंदोलन स्थगित करण्यात आले. पण कोणताही निर्णय न झाल्याने उद्या सकाळी १० वाजल्यापासून पुन्हा आंदोलन करण्यात येणार आहे.
वेंगुर्ले येथील दोन अभियंतांना तत्कालीन अधीक्षक अभियंता यांनी ते सुट्टीवर गेल्याने शहरातील वीजपुरवठा अनियमित झाल्याच्या कारणाने त्यांच्यावर ठपका ठेवत त्यांना निलंबित केले होते. या घटनेचा संघटनेने निषेध करीत आज सकाळी १० वाजल्यापासून अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले. प्रारंभिक कार्यालयाच्या गेटवर एकत्रित येत घटनेचा निषेध करण्यात आला. त्यानंतर त्यांनी अधीक्षक अभियंत्यांची भेट घेऊन चर्चा केली.
इंजिनीयर अहोरात्र काम करीत वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र प्रशासनाकडून नेहमीच दुर्लक्ष केला जातो, असे सांगत प्रशासनाच्या भूमिकेवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. वीजपुरवठा खंडित होतो याला अधिकारी जबाबदार नाहीत. वेळेत ट्री कटिंग केल्यास वीस पुरवठा खंडित होणार नाही. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करते. झाडे तोडायला पैसे दिले जात नाहीत. काही इंजिनियर स्वतःचे पैसे खर्च घालून ट्री कटिंग करून घेतात, याकडे अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांचे त्यांनी लक्ष वेधले.
आम्ही मेंटेनन्सच्या कामासाठी नियोजन करायला बैठक्या घ्या, अशी मागणी यापूर्वी प्रशासनाकडे करीत आलो. मात्र त्यासाठी वेळ नाही पण वसुलीसाठी बैठक घेतली जाते असे सांगून प्रशासन इंजिनिअरचे म्हणणे ऐकून घेत नाही, असेही यावेळी सांगितले. उपस्थित इंजिनिअर्सनी आपण कोणत्या परिस्थितीत लोकांसाठी काम करतो, हे सांगितले. प्रशासनाकडून आवश्यक सामग्री मिळत नाही. मात्र आम्ही त्यातूनही मार्ग काढत कामे करतो. मात्र एखाद्याच्या घरगुती अडचणीमुळे त्याने सुट्टी घेतली तर त्यांच्यावर अशी निलंबनाची कारवाई केली जात असेल, तर आम्ही सहन करणार नाही. निलंबनाची कारवाई रद्द करा अशी मागणी इंजिनियर्सनी केली.
मला चार दिवस मुदत द्या, चर्चा करून निर्णय घेतो असे श्री राख यांनी यावेळी सांगितले. निलंबनाच्या वेळी आपण नव्हतो. त्यामुळे मी निर्णय रद्द करू शकत नाही, असे ते म्हणाले.
खंडित वीजपुरवठा तात्काळ सुरळीत व्हावा यासाठी एजन्सी नियुक्त केल्या. मात्र या एजन्सीकडे अक्षरशः भीक मागावी लागते. आवश्यक वेळी सेवा मिळत नाही, असे इंजिनियर्सनी सांगून पूर्वीप्रमाणे कर्मचारी नियुक्त करून काम केल्यास वीजपुरवठा लवकर सुरळीत होईल असे यावेळी सांगण्यात आले. . सर्वच अभियंत्याने आपल्या समस्या पोट तिडकिने मांडल्या. सर्कल सचिव श्यामकांत कोहळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. सायंकाळी सव्वासहा वाजेपर्यंत सर्व इंजिनिअर्स ठिय्या मांडून होते. पण कोणताही निर्णय झाल्याने आणि कार्यालयीन वेळ संपल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. पण उद्या मंगळवारी सकाळी दहा वाजता पुन्हा आंदोलन सुरु करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली.

You cannot copy content of this page