मळेवाड ग्रामस्थांच्यावतीने संजू परब यांचा भव्य सत्कार..
सावंतवाडी: मळेवाड हा मोठा गाव आहे. या ठिकाणी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमांना माझी नेहेमी उपस्थिती असते. येत्या काळात या गावासाठी भरघोस विकासनिधी आमदार दीपक केसरकर व माझ्या मार्फत देण्यात येईल असे आश्वासन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी उपस्थितांना दिले.
दरम्यान, ग्रामपंचायतीमार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ६ मुलांना विमान सफर घडविण्यात येणार आहे. त्यांची मुंबईत राहण्याची सोय थ्री स्टार हॉटेल मध्ये करण्याचे आश्वासनही श्री. परब यांनी दिले.
युवा मित्रमंडळ मळेवाड कोंडुरे व ग्रामपंचायत मळेवाड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांस्कृतिक महोत्सव २०२५ मध्ये श्री. परब बोलत होते. याप्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने श्री. परब यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे, मळेवाड सरपंच मिलन पार्सेकर, उपसरपंच हेमंत मराठे, ग्रामपंचायत सदस्य अमोल नाईक, महेश शिरसाट, सानिका शेवडे, कविता शेगडे, अर्जुन मुळीक, मधुकर जाधव, शिवसेना विभागप्रमुख व आरोस सरपंच शंकर नाईक, शाखाप्रमुख अमित नाईक आदी उपस्थितीत होते.
