सावंतवाडीत आवाज साधना शास्त्र कार्यशाळा संपन्न…

कुडाळ : सावंतवाडी येथील ‘रघुकुल स्वरविहारच्या’ बाराव्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी रोटरी क्लब हॉल, सावंतवाडी येथे ‘आवाज साधना शास्त्र (Voice Culture) कार्यशाळा’ संपन्न झाली. पं. डॉ. समीर दुबळे, पुणे यांनी आवाज साधना शास्त्राबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.
डॉ. समीर दुबळे हे नामवंत गायक तसेच आवाज साधना शास्त्राचे अध्यापक असून पं. राम माटे, पं. अशोक रानडे व पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य आहेत. दोन सत्रांमध्ये संपन्न झालेल्या या एकदिवसीय कार्यशाळेमध्ये सर्व वयोगटांतील ६१ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. कार्यशाळेचे निवेदन संजय कात्रे यांनी केले.
उद्घाटन प्रसंगी पं. डॉ. समीर दुबळे, महेश जोशी, अभिजीत बारटक्के (पुणे), दिनकर परब, संजय गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलन, प्रतिमा पूजन व मान्यवरांचे स्वागत करून कार्यशाळेस सुरुवात झाली.
सकाळच्या सत्रामध्ये आवाज साधना शास्त्राची प्राथमिक ओळख, गाणारा आवाज विकसित आणि प्रशिक्षित करण्यासाठी श्रवणाचे व श्वासावर नियंत्रण ठेवण्याचे महत्व तसेच तानपुरा नीट ऐकून हुंकार व आकार योग्य पद्धतीने लावण्याचे तंत्र याविषयीचे बहुमोल मार्गदर्शन पं. डॉ. समीर दुबळे यांनी केले. दुपारच्या सत्रामध्ये गानोच्चार व शब्दोच्चार सुधारण्यासाठी पाटाक्षरांचा सराव, आवाजाचे काही प्राथमिक व्यायामप्रकार तसेच सुगम संगीतामध्येही आवाजाचा योग्य वापर कसा करावा याचे मार्गदर्शन डॉ. दुबळे सर यांनी केले. आवाजाची काळजी कशी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन करत त्यांनी प्रशिक्षणार्थींच्या आवाजाविषयीच्या शंकांचे निरसन केले. कार्यशाळेच्या शेवटी प्रशिक्षणार्थींमधून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सौ. रश्मी सामंत-नाडकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यशाळेच्या द्वितीय सत्रामध्ये सावंतवाडीतील नामवंत वकील ॲड. शामराव सावंत यांची विशेष उपस्थिती लाभली. प्रशिक्षणार्थींचा असाच सुंदर प्रतिसाद मिळाल्यास आवाज साधना शास्त्राबद्दल सविस्तर मार्गदर्शन मिळावे या हेतूने येणाऱ्या काळात ‘दोन दिवसीय निवासी कार्यशाळा’ आयोजित करण्यास आम्ही तत्पर आहोत असे संस्थेच्या संचालिका सौ. ईश्वरी तेजम (नूतन परब) यांनी सांगितले. या कार्यशाळेला फार चांगला प्रतिसाद लाभला.

You cannot copy content of this page