मंत्री उदय सामंत यांना भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचा प्रश्न..
ओरोस ता २३
महायुतीमध्ये पक्ष वाढविण्याचा हक्क सर्वांनाच आहे. त्यामुळे महायुतीची ताकद वाढत असेल तर आम्हाला पण आनंदच आहे. परंतु महायुती व्यतिरिक्त पक्षातील लोकांचा प्रवेश करून घ्यावा. महायुतीतील पक्षाचे कार्यकर्ते फोडणे म्हणजे महायुतीच्या भरलेल्या जेवणाच्या ताटातील वाटीत किंवा वाटीतील ताटात करणे चुकीचे आहे, अशी अपेक्षा शिंदे शिवसेनेच्या पक्षप्रवेश कार्यक्रमावर बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली.
शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख तथा महायुतीचे मंत्री उदय सामंत यांनी, सावंतवाडी येथील पक्षाच्या कार्यक्रमात प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमचे दोन आमदार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात वर्चस्व आमचे आहे. आम्ही पक्ष वाढविला तर कोणाच्या पोटात का दुखते ? अशी टीका केली होती. याला भाजप जिल्हाध्यक्ष सावंत यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले आहे. सिंधुदुर्गनगरी येथील भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई, सुप्रिया वालावलकर आणि अन्य उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना श्री सावंत यांनी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीचे तीनही आमदार युती असल्यामुळे मताधिक्याने निवडून आले आहेत. निधी आणि विविध समित्या वाटपाचे सूत्र ठरलेले आहे. त्यानुसार ते होईलच.आम्ही महायुती सत्तेतील पक्षांमधील कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश करणार नाही व तसाच शिंदे शिवसेनेने भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश करून घेऊ नये. महायुती धर्म पाळावा. महायुतीची ताकद आणखी वाढवावी असे आवाहन सांगितले.
मागील लोकसभा व त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुका भाजपाच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या होत्या. महायुतीच्या उमेदवाराला लोकसभेला २ लाख ५७ तर विधानसभेला २ लाख ७१ हजार मतदान झाले होते. तर सभासद नोंदणीत भाजपाचे १ लाख ७० हजार अधिकृत सभासद झाले आहेत. ही आकडेवारी पाहता सिंधुदुर्ग जिल्हा भाजपचा बालेकिल्ला आहे, हे सिद्ध होते. महायुतीचे या जिल्ह्यात तीन आमदार असून या तिन्ही आमदारांच्या विजयामध्ये भाजपा सह महायुती मधील शिंदे शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी या सर्वांचे योगदान आहे. पुढच्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत निवडणुका होणार आहेत. त्यासाठी महायुतीची ताकद आणखी वाढत असेल तर आनंदच आहे. असेही यावेळी प्रभाकर सावंत यांनी स्पष्ट केले. भारतीय जनता पक्षातील कार्यकर्त्यांचे शिवसेना पक्षात प्रवेश घेऊन महायुतीची ताकद वाढणार नाही. त्यामुळे आम्ही पक्ष वाढवितो म्हणून काहींच्या पोटात दुखते हे मंत्री सामंत यांचे विधान क्लेशदायक आहे. याबाबत त्यांनी पुढे दक्षता घ्यावी असे आवाहन सावंत यांनी केले. .
चौकट
भारतीय जनता पक्ष कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, मंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना मागील काळातील भाजपची ताकद संघटनात्मक बळकटीमुळे आणखी वाढली आहे. मात्र आमच्या सर्वच नेत्यानी महायुतीतील मित्र पक्षांमधील त्यांच्या कार्यकर्त्यांचे भाजप प्रवेश कटाक्षाने टाळले आहेत. अन्य विरोधी पक्षातील पक्षप्रवेश भाजपने केले असून पक्षाची ताकद वाढविली आहे, असे सांगतानाच सावंत यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी महायुतीतील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होणार नाही, असे जाहीर केले आहे. त्याबाबत मी त्यांचे धन्यवाद मानतो, असे सांगितले.
फोटो ओळ:- सिंधुदुर्गनगरी:
