सौ. मिताली कोरगावकर यांना राष्ट्रीय गौरव पुरस्कार जाहीर…

⚡मालवण ता.२०-:
गोवा सरकारी पी. डब्ल्यू. डी. स्टाफ को. ऑप. क्रेडिट सोसायटी यांच्या सहकार्याने आणि इंटिग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी बेळगांव व नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव यांच्या तर्फे दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, गोवा येथील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या निवडक व्यक्तींचा राष्ट्रीय गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार असून यामध्ये आचरा पिरावाडी येथील सामाजिक कार्यकर्त्या आणि उद्योजिका सौ. मिताली प्रशांत कोरगावकर यांना त्यांच्या उद्योजकीय व सामाजिक कार्याची दखल घेत राष्ट्रीय गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण दि. २७ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता मान्यवरांच्या हस्ते रविंद्र भवन, साखळी गोवा येथे होणार आहे.

सौ. मिताली कोरगावकर या उद्योजिका असून हॉटेल, पर्यटन व काजुगर व्यवसायात त्या कार्यरत आहेत. महिला बचत गट प्रमुख म्हणून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी, महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी त्या गेली पंचवीस वर्ष कार्यरत आहेत. सागरीका बोट सफारी, आचरा च्या त्या अध्यक्षा आहेत. तसेच आचरा दक्षता समिती सदस्य आहेत. तर यशराज प्रेरणा ग्रुप आचरा च्या त्या सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. स्वच्छता मोहिम राबविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून त्यांचा पुढाकार असतो. त्यांना या अगोदर २०२२ सालचा अष्टगंध पुरस्कार तसेच आचरा पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा महिला गौरव पुरस्कार मिळाला आहे. आता राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून त्यांच्या या यशाबद्दल सोमवारी २८ एप्रिल रोजी आचरा येथून ढोल पथकाच्या साथीने मिरवणूक काढून स्वागत करण्यात येणार आहे. यामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page