मोबाईलसाठी नाही, मुलांसाठी वेळ द्या !

पिंगुळी ग्रा. प. आयोजित परिसंवादातील सूर:नामवंत वक्त्यांचा सहभाग..

⚡कुडाळ ता.०८-: अलीकडे मोबाईलच्या अनाठायी वापरामुळे घराघरातील सुसंवाद हरपला आहे. पालकही आपल्या व्यस्त कार्यक्रमांतून मुलांसाठी वेळ द्यायला तयार नाहीत.  अशावेळी ‘मोबाईल हाच आपला मित्र’ असा गैरसमज मुलांच्या मनात निर्माण होऊन मोबाईल स्क्रीन टाईम वाढत आहे. यातून अनेक गंभीर परिणाम भविष्यात भोगावे लागतील.  त्यामुळे सजग पालकत्व पत्करून प्रत्येक पालकाने आपली जबाबदारी आणि कर्तव्य स्वीकारून आपल्या मुलांसाठी वेळ देणे गरजेचे आहे. असा सूर पिंगुळी येथे आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादातून उमटला.
पिंगुळी ग्रामपंचायतच्या माध्यमातून ‘ग्रामपंचायत आपल्या दारी.!’ या उपक्रमाअंतर्गत शालेय मुले व पालक यांच्यासाठी मोबाईल आजची मुले व पुस्तक मुलांचे हरवलेले बालपण या विषयावर मार्गदर्शन व परिसंवादाचे आयोजन सदगुरू राऊळ महाराज मठ सभागृहात करण्यात आले होते.
या परिसंवादात संत राऊळ महाराज कॉलेजच्या प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, प्रेरणादायी वक्ते प्रा. रुपेश पाटील, ज्येष्ठ साहित्यिका वृंदा कांबळी, ज्येष्ठ साहित्यिक भरत गावडे, सौ. जयश्री चिलवंत यांनी सहभाग घेतला होता.
यावेळी सरपंच अजय आकेरकर  सागर रणसिंग, मंगेश चव्हाण, मंगेश मस्के, आर्या बांदेकर, शशांक पिंगुळकर, केशव पिंगुळकर, सौ. ममता  राऊळ, सौ. अश्विनी गंगावणे, सौ. अंकिता जाधव, नूतन गावडे, ग्रामसेवक राजेश निवतकर उपस्थित होते.
दरम्यान शालेय मुले व पालक यांच्यासाठी ‘मोबाईल, आजची मुले व पुस्तक’, ‘मुलांचे हरवलेले बालपण’ याविषयी मार्गदर्शन परिसंवाद झाला.  यात ‘मोबाईलमुळे बालपणाची निखळता आणि निरागसता हरवली आहे का?’ या विषयावर जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी मार्गदर्शन केले. तर ‘पालकांचे पालकत्व गेले कुठे?’ या विषयावर प्रेरणादायी वक्ते प्रा. रुपेश पाटील यांनी सखोल मार्गदर्शन केले. ज्येष्ठ लेखिका वृंदा कांबळी यांनी ‘मोबाईलमुळे वाचन संस्कृतीचा ऱ्हास होतोय का?’ या विषययावर तर ज्येष्ठ मराठी भाषा तज्ज्ञ भरत गावडे यांनी ‘मोबाईलमुळे बाल गुन्हेगारी वाढून बालकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय का ?’ यावर भाष्य केले. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे होत्या.
दरम्यान परिसंवादात जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत म्हणाले की, आज मोबाईलमुळे मुले तासनतास मोबाईलवरच खेळ खेळतात. त्यामुळे क्रीडांगणे ओस पडली आहेत. मुलांची शारीरिक क्षमता कमजोर झाली आहे.  त्यामुळे पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांना मैदानावर खेळण्यासाठी प्रवृत्त करावे.  जेणेकरून त्यांची शारीरिक आणि मानसिक जडणघडण होईल. प्रा. रुपेश पाटील म्हणाले, आज पालकांनी सजग राहणे अत्यंत गरजेचे आहे. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांनी शिवबा घडविले. कारण त्यांनी बालवयातच शिवबांवर विविध महापुरुषांचे संस्कार बिंबवले. पण आजची आधुनिक मम्मी स्वतः मोबाईलच्या आहारी जाताना दिसत आहे. परिणामी आम्ही मुलांना काय देत आहोत?, याचे चिंतन करण्याची गरज आहे.  मुलांच्या भवितव्यासाठी पालकांनी स्वतःचा वेळ देणे आणि आपापसातील सुसंवाद घडवून आणणे गरजेचे आहे, असेही प्रा. पाटील यांनी स्पष्ट केले. परिसंवादाच्या अध्यक्षा डॉ. स्मिता सुरवसे यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण मनोगतातून मोबाईलमुळे आपला अमूल्य वेळ कसा वाया जातो आहे?,  हे विशद केले.  तसेच त्यांनी मोबाईलमुळे आपले शरीर आणि मनाचे किती प्रकारचे विकार निर्माण होऊ शकतात?,  हे सांगून विद्यार्थी व पालकांना उपयुक्त टिप्स दिल्या.
या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वाबरोबरच राजन पांचाळ, प्रसाद दळवी, आप्पा सावंत, गोविंद चव्हाण, सदाशिव गावडे, अश्विनी सावंत, स्वरा काळसेकर, ईशा सातार्डेकर, विनायक केरकर, सतीश माडये, वैभव धुरी, बाबली पिंगुळकर, सुभाष सावंत, श्रीमती योगिता, श्रीमती राणे, प्रिया पांचाळ, साधना माडये, रामदास सावंत, अरुण सावंत, मेघना सावंत, प्रिया आमडोसकर, नितीन पिंगुळकर, सागर वालावलकर, संदेश गावडे, बाळकृष्ण सडवेलकर, प्रवीण राऊळ, वैशाली राऊळ, मंडळ अधिकारी श्री. गुरव, संपदा धुरी, माधवी मसके, मोहन पिंगुळकर तसेच परमपूज्य राऊळ महाराज सेवा ट्रस्ट, प. पू .विनायक अण्णा राऊळ महाराज सेवा ट्रस्ट,  गावातील सर्व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी वृंद,  सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी, गावातील ग्रामस्थ, पालक वर्ग, गावातील सर्व ग्रंथाचे अध्यक्ष, प्रतिनिधी, महिला बचत गट यांचे सहकार्य लाभले.
या परिसंवादाचे सूत्रसंचालन सौ. जयश्री चिलवंत यांनी केले तर आभार  स्वरा केळूसकर यांनी मानले. शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

You cannot copy content of this page