कुडाळ : कुडाळ शहरात आज शहरवासियांनी मोठ्या जल्लोषात रंग आणि पाण्याची उधळण करत धुळवड आणि रंगपंचमी साजरी केली.
नाक्यानाक्यावर आणि सोसायट्यामध्ये युवक, लहान मुले रंग खेळताना पाहायला मिळाले. यावेळी कुडाळ शहरातील दिड दिवसाच्या शिमगोत्सवाची धूलिवंदनाने सांगता झाली.
शहरातील जिजामाता चौक येथे सालाबादप्रमाणे सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी एकत्र येत रंगांची उधळण करीत धुळवड साजरी केली. वेगवेगळी सोंगे घेत शिमग्याचे पोस्त मागण्याची परंपरा देखील जपण्यात आली. काही ठिकाणी डीजे तर काही ठिकाणी ढोल पथकाच्या तालावर तरुणाई रंग खेळताना पाहायला मिळाली.
जिल्ह्यात सर्वत्र गुरूवार पासून सर्वत्र मोठ्या उत्साहात शिमगोत्सवाला प्रारंभ झाला असून शिमगोत्सवाची धूम चालू आहे. जिल्ह्यात दीड, पाच, सात, पंधरा दिवसांचा शिमगा असतो. शुक्रवारी ठिकठिकाणी रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कुडाळ शहरात रंगांची उधळण करीत शहरवासियांनी रंगपंचमीचा आनंद लुटला. दुपारी शहरातील दिड दिवसाच्या शिमगोत्सवाची सांगता झाली. मात्र ग्रामीण भागात शिमगोत्सवाची उत्साहात साजरा केला जात आहे.
कुडाळात जल्लोषात धुळवड साजरी…
