मसुरे केंद्र शाळेमध्ये शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ…

आंदोलन छेडण्याचा माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर यांचा इशारा..

मालवण (प्रतिनिधी)

दीडशे वर्षे जुन्या असलेल्या मसुरे केंद्र शाळेमध्ये आदल्या दिवशी कायम असलेले दोन शिक्षक याच शाळेत कामगिरी वरती म्हणून त्यांची नियुक्ती शिक्षण विभागाने केली असून स्थानिक शालेय समितीला व ग्रामस्थांना अंधारात ठेवून एका शिक्षकाची चक्क बदली करून त्यांना कार्यमुक्त केले आहे. शिक्षण विभागाच्या या सावळ्या गोंधळाबाबत स्थानिक ग्रामस्थ आक्रमक बनले असून आता या शाळेत एक शिक्षक फक्त कायमस्वरूपी असून होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नुकसानाला कोण जबाबदार राहणार असा प्रश्न ग्रामस्थांनी केला आहे.

दरम्यान, शिक्षण विभागाच्या या भोंगळ कारभाराबाबत आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांचे लक्ष वेधणार असल्याचे मसुरेच्या माजी सरपंच सौ. लक्ष्मी पेडणेकर यांनी सांगितले. तसेच याआंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने दिला आहे. तसेच या शाळेला कायमस्वरूपी शिक्षक मिळाले नाही तर शाळा बंद आंदोलन करून मालवण येथील त्या शिक्षण अधिकाऱ्याच्या दालना बाहेर मुलांची शाळा भरविणार असल्याचा इशारा शाळा व्यवस्थापन समिती व लक्ष्मी पेडणेकर यांनी दिला आहे.

मालवण तालुक्यातील मसुरे केंद्र शाळेमध्ये सेमी इंग्रजी असून या ठिकाणी पहिली ते आठवी वर्ग आहेत. सुमारे ८० ते ९० विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. या ठिकाणी केडर प्रमाणे चार शिक्षक मंजूर होते. या ठिकाणी चार शिक्षक कार्यरत देखील होते. परंतु दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील एका वरिष्ठ शिक्षण अधिकाऱ्याच्या आदेशावरून मालवण तालुक्यातील एका शिक्षण अधिकाऱ्याने लगेच फतवाकडून येथील एका शिक्षकाला कार्यमुक्त केले आणि उर्वरित दोन शिक्षकांना त्यांच्या दुसऱ्या शाळेवरती दाखवून पुन्हा याच शाळेमध्ये कामगिरी वरती आणण्याचा अजब असा सावळा गोंधळ केला आहे. याबाबत ग्रामस्थांनी मालवण येथील शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला दूरध्वनीवरून संपर्क केला असता सदर अधिकारी संपूर्ण दिवसभर दूरध्वनीवर उपलब्ध झाला नाही. तर एकदा कॉल लागल्यावर त्याने थोड्या वेळाने पुन्हा कॉल करतो असे सांगून फोन ठेवून दिला, असे ग्रामस्थांनी सांगितले.

याबाबत शाळा व्यवस्थापन समिती सुद्धा आक्रमक झाली असून याप्रशालेत कायमस्वरूपी शिक्षक मिळाले नाही तर शाळा बंद आंदोलन करून मालवण येथील त्या शिक्षण अधिकाऱ्याच्या दालना बाहेर मुलांची शाळा भरविणार असल्याचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शितल मसुरकर, उपाध्यक्ष संतोष दुखंडे आणि माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर यांनी इशारा दिला आहे. ग्रामस्थांना तसेच शाळा व्यवस्थापन समितीला विश्वासात न घेता शिक्षण विभागाच्या अधिकारी वर्गाने येथील शिक्षकांना कार्यमुक्त केले असून शिक्षण विभागाला शाळेवरती मनमानी करण्याचा अधिकार कोणी दिला ? असा प्रश्न ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीने केला आहे.

शिक्षण विभागाने मसुरे केंद्र शाळेवरती एक प्रकारे अन्याय करून येथील विद्यार्थ्यांचे नुकसान सदरच्या दोन आणि या प्रक्रियेमधील लहान थोर सर्व अधिकाऱ्यांमुळे होत आहे. याबाबत मालवणच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्याला वारंवार दूरध्वनी करूनही त्यांच्याकडून दखल घेतली गेली नसल्यामुळे संबंधित अधिकाऱ्या विरोधात नाराजी पसरली आहे असे लक्ष्मी पेडणेकर यांनी यावेळी सांगितले.

या प्रशालेतील एक शिक्षक गेल्यावर्षी आंतरजिल्हा बदली होऊ नये यासाठी त्या शिक्षकाचे काहीतरी देयक बाकी असल्यामुळे एक वर्ष शिक्षण विभागाने त्याला थांबवून धरले होते आणि आता असा अचानक कोणता चमत्कार घडला म्हणून जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या मोठ्या अधिकाऱ्याने त्याला कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले. याबाबतही सखोल चौकशी होणे जरुरीचे असून संबंधित विभागातील मालवण तालुक्यातील आणि जिल्ह्यातील दोन्ही अधिकाऱ्यांची तसेच ग्रामस्थांना विश्वासात न घेता या आदेशांची अंमलबजावणी करणाऱ्या सर्वांची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्याची मागणी लक्ष्मी पेडणेकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page