⚡मालवण ता.११-:
मालवणातील ठाकरे शिवसेनेचे काही माजी नगरसेवक आणि पदाधिकारी ठाकरे शिवसेनेला रामराम ठोकून भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच या प्रवेशाचा सारा योग जुळून आल्याने आज रात्रौ मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगरसेवक मंदार केणी, माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक यतिन खोत, समाजसेविका तथा युवासेना कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघ प्रमुख सौ. शिल्पा यतिन खोत, माजी नगरसेविका सौ. दर्शना कासवकर, समाजेवक भाई कासवकर उपशहरप्रमुख नंदा सारंग हे प्रवेशकर्ते होणार आहेत भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होत असल्याची माहिती दस्तुरखुद्द मंदार केणी यांनी दिली आहे
दरम्यान, ठाकरे शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या कारभाराला कंटाळून आपण व आपले सहकारी ठाकरे शिवसेनेला सोडचिठ्ठी देत असल्याचे केणी यांनी सांगतानाच माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर आमचा कोणताही रोष नाही असे स्पष्ट केले आहे.
आपल्या प्रवेशाबाबत श्री केणी यांनी भ्रमणध्वनी वरून बोलताना सांगितले की, ठाकरे शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्याशी आमचे कधीही पटले नाही, कायम संघर्षच राहिला, खोबरेकर यांचा आम्हाला विरोध राहिला. पक्षाची भूमिका मांडताना बोलायला कोणीही नसल्याने मी जिल्हा प्रवक्ते पद मागून घेतले, आपल्याला देण्यात आलेले जिल्हा प्रवक्तेपदही अधिकृत नव्हते, मात्र या पदालाही स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध होता असेही केणी म्हणाले.
