प्रशांत दळवी यांना आरती प्रभू पुरस्कार प्रदान…

⚡कुडाळ ता.०९-: येथील बाबा वर्दम थिएटर्स आणि आरती प्रभू कला अकादमी या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा यंदाचा आरती प्रभू पुरस्कार मुंबई येथील प्रसिध्द नाटककार प्रशांत दळवी यांना शनिवारी सायंकाळी प्रदान करण्यात आला. चिं.त्र्यं. खानोलकर ऊर्फ आरती प्रभू यांच्या जन्मदिनी ज्येष्ठ कवयित्री नीरजा यांच्या हस्ते हा पुरस्कार दळवी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. रोख २१ हजार रूपये, स्मृतीचिन्ह, मानपत्र आणि शाल-श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ आणि आरती प्रभू कला अकादमी, कुडाळ या संस्थांच्या संयुक्त विद्यमान हा आरती प्रभू पुरस्कार सन २०१३ पासून कविता आणि नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कवी किंवा नाटककारास दरवर्षी दिला जातो.
संत राऊळ महाराज महाविद्यालयात एकनाथ ठाकूर सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. कवियित्री नीरजा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तसेच सुप्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि प्रशांत दळवी यांच्या हस्ते चिं त्र्यं खानोलकर उर्फ आरती प्रभू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सोहळ्याची सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा बाबा वर्दम थियेटर्सच्या अध्यक्षा वर्षा वैद्य, कवयित्री नीरजा, सुप्रसिद्ध लेखक प्रशांत दळवी, सुप्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, कमशिप्र मंडळाचे उप कार्याध्यक्ष अरविंद शिरसाट, आरती प्रभू कला अकादमीचे अध्यक्ष अंनत वैद्य, ज्येष्ठ दिग्दर्शक चंदू शिरसाट, वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे उदय पंडित आदी उपस्थित होते. कवियत्री नीरजा यांच्या हस्ते प्रशांत दळवी याना आरती प्रभू पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख २१ हजार रूपये, स्मृतीचिन्ह, मानपत्र आणि शाल-श्रीफळ अस या पुरस्काराचे स्वरुप आहे.
यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रशांत दळवी यांनी चिं त्र्यं खानोलकर यांच्या साहित्याचे विवेचन करून पुरस्कराबद्दल आयोजकांचे आभार मानले. तर सुप्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी आपले मित्र प्रशांत दळवी, त्यांची जिगिशा संस्था या विषयी सांगून दळवींचा नाट्य प्रवास उलगडला. कवयित्री नीरजा यांनी कुडाळचा ‘नाटकाने मंत्राळलेले गाव’ असा उल्लेख करून येथील नाट्य चळवळीचे विशेष कौतुक केले. ज्यांना ज्यांना हा पुरस्कार मिळाला त्यांची नवे पाहता, हा त्या पुरस्काराचा गौरव आहे असे त्यांनी सांगितले. प्रशांत दळवी हे स्त्रीला मध्यवर्ती ठेऊन नाट्यनिर्मिती करणारे नाटककार आहेत. त्यामुळे आज महिला दिनाचे औचित्य साधून त्याना पुरस्कार देण्यात येत आहे हे फार औचित्यपूर्ण असल्याचे नीरजा यांनी सांगितले. त्यांनी प्रशांत दळवींची विविध नाटके, त्या नाटकातील व्यक्तिरेखा यांच्या बद्दल सुंदर शब्दात विवेचन केले.
बाबा वर्दम थियेटर्सच्या अध्यक्षा वर्षा वैद्य यांनी प्रशांत दळवी याना मिळविलेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे कौतुक करून त्यांना दिलेला हा पुरस्कार हा त्या पुरस्काराचा,या रंगमंचाचा आणि बाबा वर्दम थिएटर्स व आरती प्रभू कला अकादमी या संस्थांचाही सन्मान आहे. आमचा मान त्यामुळे वाढला आहे असे सांगितले. चंद्रकांत कुलकर्णी यांनी कुडाळमध्ये एखादी कार्यशाळा घ्यावी अशी विनंती चंद्रकांत कुलकर्णी यांना या निमित्ताने केली.
यावेळी उदय पंडित यांच्या ‘रंगवाचा’ या त्रैमासिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केदार सामंत यांनी करून या पुराकाराबद्दल आणि बाबा वर्दम थियेटर्सबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल वालावलकर यांनी केले. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर प्रशांत दळवी आणि चंद्रकांत कुलकर्णी यांची मुलाखत रंगकर्मी डॉ. गुरुराज कुलकर्णी यांनी घेतली.कार्यक्रमाला रसिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

You cannot copy content of this page