कुडाळ : तालुक्यातील कवठी अन्नशांतीवाडी येथील संदीप उर्फ बाळा दामोदर करलकर वय 52) याच्या खून प्रकरणातील फरार असलेले मुख्य आरोपी रामचंद्र उर्फ दादा दत्ताराम करलकर (वय 40) व शैलेश दत्ताराम कलरकर करालकर (वय 43) (दोघेही राहणार कवठी वाडीवाडा) या दोघांना चेंदवण-निरुखेवाडी येथून निवती पोलिसांनी रविवारी सायंकाळी अटक केली. या दोघांना सोमवारी कुडाळ न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यापूर्वी करलकर यांचा कामगार व या खून प्रकरणात सहभागी असलेल्या श्यामसुंदर प्रभाकर वाडयेकर याला पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे आता खून प्रकरणातील आरोपींची संख्या तीन झाली आहे.
काजूच्या बागेत जाऊन काजू चोरून उलट वडिलांना व कामगारांना धमकावल्याच्या रागाने त्याचा जाब विचारण्यासाठी दादा करलकर, शैलेश करलकर व श्यामसुंदर वाडयेकर हे संदीप करलकर यांच्या घरी 27 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास केले होते. त्यावेळी त्यांच्यात झालेल्या मारामारीत संदीप करलकर याला दादा करलकर शैलेश करलकर व श्यामसुंदर वाडयेकर यांनी मिळून जबर मारहाण केली होती. या मारामारीत संदीप जखमी झाला. त्याच्या मानेचा मणका तुटल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता.
मात्र घटनेनंतर कोणीच पोलीस यंत्रणेला कळवले नाही. 28 फेब्रुवारी रोजी याबाबत पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर पोलिसांची तपासाची चक्रे फिरली. आता संदीपच्या खुनात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. उद्या त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. त्यानंतर तिन्ही आरोपीकडे तपास करताना यात आणखी कोणी सहभागी होते का याचा तपास पोलीस करणार आहेत.
कवठी खून प्रकरणातील फरार दोन संशयितांना अटक…
