⚡मालवण ता.०२-:
मालवण शहरातील बाजारपेठेमध्ये गटार आणि रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या अतिक्रमणांवर नगरपालिका प्रशासनाने धडक कारवाई करण्याची मोहिम राबविली. यात अनेकांना सूचना करूनही रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यात न आल्याने नगरपालिकेकडून सदरचे अतिक्रमण जप्त करण्यात आले आहे. सदरची मोहिम शहरातील सर्वच रस्त्यांवर राबविण्यात येणार असल्याचेही नगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
मालवण शहरातील अनेक रस्त्यांवरील आणि गटारांवर झालेल्या अतिक्रमणामुळे शहरातील नागरिकांना वाहतूक करताना अडचणी निर्माण होत होत्या. नगरपालिका प्रशासनाकडून वारंवार संबंधितांना सूचना करण्यात येवूनही कोणत्याही प्रकारचे सहकार्य करण्यात येत नसल्याने प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलला. मालवण बाजारपेठेतील मुख्य मार्ग असलेल्या प्रमुख असलेल्या गल्लीतील अतिक्रमणे हटविण्यास सुरूवात करण्यात आली. तसेच बाजारपेठेतील गटारांवर करण्यात आलेले अतिक्रमणही हटविण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यापुर्वीही नगरपालिका प्रशासनाकडून अशाप्रकारची धडक कारवाई करण्यात आली होती. यामुळे काही वर्षे रस्त्यांवरील अतिक्रमणे अगर गटारांवरील अतिक्रमण थांबली होती. मात्र आता नगरपालिका प्रशासनाने पुन्हा एकदा धडक कारवाई केल्याने अनेकांची पळापळ झाली होती.
नगरपालिकेकडून मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी नियुक्त केलेल्या धडक कारवाई पथकामध्ये स्वच्छता अभियंता अमोल काटवळ, स्वच्छता निरीक्षक संजय पवार, स्वच्छता लिपीक मंदार केळुसकर, मुकादम आनंद वळंजू, सचिन कासले तसेच स्वच्छता विभागातील सर्व कर्मचारी व अधिकारी यांचा यामध्ये समावेश होता. शुक्रवार सकाळपासून अतिक्रमण जप्त करण्याची मोहिम राबविण्यात आली होती.
शहरातील प्रमुख गल्ली असलेल्या रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे नगरपालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात हटविले. यामुळे प्रमुख रस्त्याने अनेक वर्षांनंतर मोकळा श्वास घेतला होता. या मार्गावरून दुचाकी वाहतूक करणे जिकरीचे बनले होते. नगरपालिका प्रशासनाने धडक कारवाई केल्यामुळे वाहनचालकांतून समाधान व्यक्त होत आहे. शहरातील इतरही रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यासाठीही नगरपालिका प्रशासनाने आराखडा तयार केल्याचीही माहिती उपलब्ध झाली आहे.
