⚡मालवण ता.०२-:
डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त रविवारी देशव्यापी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याच स्वच्छता अभियाना अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील दहा ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून सुमारे ८१ टन कचरा संकलित करण्यात आला.
जिल्ह्यातील या स्वच्छता मोहिमेत डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे २३७६ श्रीसदस्य सहभागी झाले होते. यामध्ये मालवण मधील चिवला समुद्रकिनारा, कासार्डे येथील श्री महालक्ष्मी मंदीर व श्री विठ्ठलादेवी मंदीर परिसर, तळेरे बसस्थानक, पंचायत समिती वैभववाडी, पी.एच.सी.फोंडाघाट, एस.टी.स्टॅंड कणकवली, पिंगुळी तिठा रस्ता, निमूसगा ते लाईट हाऊस रस्ता, सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालय, कुणकेश्वर मंदीर परिसर व रस्ता या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी ८१ टन कचरा संग्रहित करून ३९५०० चौ.मी. परिसर, १० कि.मी. दुतर्फा रस्ता व २ कि.मी.समुद्रकिनारा पूर्णतः स्वच्छ करण्यात आला. या मोहिमेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले.
