संदीप करलकर खून प्रकरणी एक जण ताब्यात ; 4 दिवसांची पोलीस कोठडी…

⚡कुडाळ ता.०१-: तालुक्यातील कवठी-अन्नशांतवाडी येथील संदिप उर्फ बाळा दामोदर करलकर याचा मारहाणीत वर्मी घाव बसल्याने मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. दरम्यान या खुन प्रकरणात तीन संशयित पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यापैकी श्यामसुंदर प्रभाकर वाडयेकर (रा.कवठी-बांदेकरवाडी) याला पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी ताब्यात घेतले. त्याला आज शनिवारी कुडाळ येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मयत संदिप करलकर याला संशयितांनी आपल्या वडीलांना शिविगाळ का केलीस? असा जाब रागाच्या भरात त्याच्या घरी जाऊन विचारला. यावेळी झालेल्या झटापटीत संदिप करलकर गंभीर जखमी झाला व त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस तपासात पुढे येत आहे. दरम्यान या प्रकरणातील अन्य दोन संशयित पोलिसांच्या रडारवर असुन लवकरच त्यांना जेरबंद करु असा विश्वास निवती पोलुस ठाण्याचे तपासी पोलीस अधिकारी भीमसेन गायकवाड यांनी व्यक्त केला.
कुडाळ तालुक्यातील कवठी अन्नशांतवाडीत संशयित श्यामसुंदर प्रभाकर वाडयेकर हा मंगळवार दि.२६ फेब्रुवारी रोजी सकाळी “अण्णा” नामक एका बागायतदाराच्या बागेत काम करत होता. यावेळी बाग मालक अण्णा सुद्धा त्याच्या समवेत होता. याचदरम्यान गावातीलच संदिप उर्फ बाळा दामोदर करलकर हा बागेतील काजू चोरत होता; म्हणून कामगार शामसुंदर वाडयेकर याने त्याला याबाबत जाब विचारला. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन धक्काबुक्की झाली. हा वाद वाढताच अण्णा यांनी भांडण करु नका, त्याला काय ते काजू चोरुन घेऊन जावू देत असे श्यामसुंदरला सांगितले. त्यानंतर हा वाद शांत झाला. काही अंतरावर संदीप करलकर पुढे गेला आणि पुन्हा हातात दगड घेऊन अण्णा व शामसुंदर वाडेकर यांच्यावर भिरकावला व तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी दिली. हा झाला प्रकार अण्णा व कामगार शामसुंदर वाडयेकर यांनी घरी येऊन सांगितला. आपल्या वडिलांना संदिप करलकर याने शिवीगाळ केली याचा राग मनात धरून रामचंद्र दत्ताराम करलकर, शैलेश दत्ताराम कलरकर हे आपला कामगार श्यामसुंदर याला सोबत घेत गुरुवारी सकाळीच काजूच्या बागेत गेले. काजू चोरण्यासाठी संदिप करलकर बागेत येतो का नाही याची वाट पाहिली. पण संदिप बागेत आला नसल्याने तिघेही अन्नशांतवाडी येथील संदीप करलकर यांच्या घरी गेले.
संदीप करलकर यांच्या अंगणात जाऊन त्याला बाहेर बोलावले. मात्र संदिप बाहेर येण्यास तयार झाला नाही, म्हणून हे तिघेजण संदीपच्या घरातील समोरच्या व्हरांड्यात गेले, यावेळी संदिप करलकर याने कामगार शामसुंदर वाडयेकर याच्याशी गोड बोलून, तुला खायला पान आणतो असे सांगून तो घरात गेला व घरातून त्याने चक्क लाकडी दांडा आणला. यावेळी संदीप करलकर याची कामगार शामसुंदर वाडयेकर, रामचंद्र करलकर व शैलेश करलकर या तिघांची झटापट झाली. या झटापटीत संदिप याच्या हातातील दांडा त्या तिघांनी काढून घेतला. यावेळी संदिप करलकर याने माझं चुकलं, यापुढे मी बागेत येणार नाही असं सांगून त्यांची माफी मागितली. पण त्या झालेल्या झटापटीत संदीप करलकर यांच्या मानेवर वर्मी बसलेल्या गंभीर घावामुळे मानेचा एक मणका तुटला. फार मोठा रक्तस्त्राव झाला. झालेल्या रक्तस्त्रवात संदीप याचा घरीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी शुक्रवारी सकाळी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून हा खुनच असल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्याने त्या दृष्टीने तपासाची चक्रे सुरू केली आणि अवघ्या काही तासात श्यामसुंदर प्रभाकर वाडयेकर या कामगाराला ताब्यात घेत अटक केली. या कामगारांने झालेला घटनाक्रम सांगितला. मात्र आमच्या झटापटी दरम्यान संदिप करलकर जिवंत होता असे कामगार शामसुंदर वाडयेकर यांने पोलिसांना दिलेल्या जबाबानीत सांगितले.
पंचनामा पूर्ण झाल्यानंतर संदिप करलकर यांच्या मृतदेहाचे कुडाळ येथील शवागृहात शवविच्छेदन करण्यात आले व शनिवारी कवठी येथील अन्नशांतवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
या खुन प्रकरणातील कामगार श्यामसुंदर वाडयेकर याला पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी अटक केली व शनिवारी कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने शामसुंदर वाडयेकर याला ४ दिवस पोलीस कोठडी सुनावली. संदीप करलकरच्या खून प्रकरणात संशयित आरोपी समवेत अन्य कोणी होते का? मारहाणीच्या वेळचा दांडा, कपडे ताब्यात घेण्यासाठी संशयिताला ५ दिवसाची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी ऍड. मिरजे यांनी पोलिसांच्या वतीने केली तर आरोपीच्या वतीने देण्यात आलेले सरकारी वकील ऍड. बिले यांनी बाजू मांडली. याबाबतचा अधिक तपास तपासणी अधिकारी निवती पोलीस ठाण्याचे भीमसेन गायकवाड करत आहेत.

You cannot copy content of this page