सौ. अस्मिता रावराणे:श्री शिवाजी वाचन मंदिरात मराठी भाषा गौरव दिन साजरा..
⚡मालवण ता.०१-:
मराठी भाषा ११३ देशांमध्ये बोलली जाते. आज अनेक भाषा लुप्त पावत असताना आपली मराठी भाषा टिकवून ठेवायची असेल तर मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यापेक्षा आपल्या बोली भाषेतून त्यांना ज्ञान दिले तरच मराठी भाषा टिकून राहील, असे प्रतिपादन सौ. अस्मिता रावराणे यांनी येथे बोलताना केले.
मालवण भरड येथील श्री शिवाजी वाचन मंदिरतर्फे मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त सकाळच्या सत्रात जि.प.प्राथमिक शाळा रेवतळे येथे शिवाजी वाचन मंदिरतर्फे सेवानिवृत्त शिक्षक व साहित्यिक रविंद्र वराडकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी रेवतळे शाळेतील मुलांनी कुसुमाग्रज यांची माहिती तसेच सामूहिक गीत गायन, बडबड गीते व देशभक्तीपर गीते सादर केली. वराडकर यांनी वि.वा.शिरवाडकर यांची बालगीते, तर रुजारिओ पिंटो स्वरचीत आई कविता मुलांना म्हणून दखविली. वाचनालयाच्या कार्यवाह सौ. वैदेही जुवाटकर यांनी बलिदान मास म्हणजे काय? याविषयीं माहिती दिली. यावेळी शाळेचे शिक्षक श्री.घोडके यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.
तर सायंकाळी शिवाजी वाचन मंदिराच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात सौ.अस्मिता रावराणे यांनी अडीज हजार वर्षापासून वापरात असलेल्या मराठी भाषेचा इतिहास उलघडून सांगितला. तसेच आता इतक्या वर्षानंतर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला त्याचे योगदान अण्णाभाऊ साठे यांचे आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी वाचक सौ. स्मिता परब यांनी मराठी भाषेवर आधारित कविता सादर केली. श्रीधर काळे यांनी आभार मानले.
तसेच २७ व २८ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज यांचे साहित्य आणि विज्ञान विषयक पुस्तकांचे प्रदर्शनही वाचनालयात आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमांना वाचनालयाचे सभासद विजय अटक, जयराम परुळेकर, रत्नाकर कोळंबकर सौ. अक्षता बांदेकर, श्रीम. हेमा परुळेकर तसेच कर्मचारी वर्ग आणि वाचक उपस्थित होते.
