⚡सावंतवाडी ता.०१-: रमेश दादाजी परब यांनी उपडाकपाल कलंबिस्त उपडाकघर म्हणून काम करीत असताना कलंबिस्त उपडाकघरातील खातेदारांच्या खात्यात अपहार केल्याप्रकरणी आरोपी यांना जामीन मंजुर करण्यात आलेला आहे. याप्रकरणी अॅड. अनिल कृष्णा निरवडेकर, अॅड. गणेश चव्हाण, अॅड. अशोक जाधव, अॅड. प्रितेश गवस, अॅड. दत्तप्रसाद ठाकूर, अॅड. केतन जाधव यांनी काम पाहिले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रमेश दादाजी परब, रा. कलंबिस्त, ता. सावंतवाडी यांनी उपडाकपाल कलंबिस्त उपडाकघर म्हणून काम करीत असताना कलंबिस्त उपडाकघरातील खातेदारांच्या बचत खाते, सुकन्या समृद्धी खाते, आवर्ती ठेव खाते व ग्रामीण टपाल जीवन विमा पॉलिसी अशा एकूण ४०३ खात्यांमध्ये अपहार करून खातेदारांचे पैसे त्यांच्या खात्यात व सरकारी हिशोबात जमा न करता आपल्या फायद्याकरिता वापरुन, तसेच काही रक्कम कार्यालयीन अकाऊंटमध्ये कमी दाखवून सरकारी रक्कम रु.५,८७,७१८.९५/- चा अपहार केल्याचे उघड झाले. रमेश दादाजी परब यांनी कलंबिस्त उपडाकघर येथे केलेल्या सरकारी रकमेच्या अपहाराची लेखी कबुली दिली असून अपहार प्रकरणी त्यांनी रक्कम रु.४,४९,९५०/- स्वखुशीने पोस्ट खात्याला परत केली. सदर अपहार प्रकरणात रमेश दादाजी परब हे खात्या अंतर्गत चौकशीत दोषी आढळून आल्यामुळे त्यांना दि.१२/०२/२०२० रोजी खात्यातून सक्तीची सेवानिवृत्ती देण्यात आली.
रमेश दादाजी परब यांनी उपडाकपाल कलंबिस्त उपडाकघर या पदावर काम करीत असताना त्यांनी वर वर्णन केल्याप्रमाणे केलेल्या आर्थिक
1
अपहारामुळे डाक विभागाने तसेच खातेदारानी त्यांचेवर दाखविलेल्या विश्वासाला तडा देऊन एकूण सरकारी रक्कम रु. ५,८७,७१८.९५/- (अक्षरी रु. पाच लाख सत्याऐशी हजार सातशे अठरा रुपये पंच्यान्नव पैसे) चा आर्थिक अपहार करून खातेदारांची व डाक विभागाची फसवणूक केली. त्यामुळे सदर आरोपी यांच्याविरूद्ध भारतीय दंड संहिता कलम ४०५,४०६, ४०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. व त्यानुसार आरोपी याला अटक करण्यात आलेली होती. आरोपी तर्फे वकील यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून सावंतवाडी येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग १ यांनी आरोपी यांची रक्कम रु. १५,०००/- रकमेच्या जामीनावर मुक्तता केली.
