खाजकुयली अंगावर टाकून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपातून मुक्तता…

देवगड तहसील कार्यालय येथील २०२१ ची घटना..

कुडाळ : देवगड तहसिलदार कार्यालयात पुरवठा शाखेत अव्वल कारकून म्हणून नेमणुकीस असलेल्या शिवराज यमनुर चव्हाण यांच्या अंगावर आशिष हेमकांत घाडी व रामचंद्र अनाजी शिर्के यांनी संगनमताने खाजकुयलीच्या बिया टाकून शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून देवगड पोलीसांनी भा.द.वि. कलम ३५३, ३३२,१०९ सह ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करुन देवगड न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सदरची केस सरकारी कामात अडथळा आणल्याबाबत असल्यामुळे ती सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आली. या कामी अति. सत्र न्यायाधीश सानिका जोशी यांनी सबळ पुराव्याअभावी आरोपींची मुक्तता केली. आरोपीतर्फे अॅड. अजित भणगे, अॅड. मिहीर भणगे, अॅड. स्वप्ना सामंत, अॅड. सुनिल मालवणकर, अॅड. तेजाली भणगे व अॅड. आशुतोष कुळकर्णी यांनी काम पाहिले. अशी माहिती ऍड. अजित भणगे यांनी दिली.
यातील हकीगत अशी की, सन २०२१ मध्ये देवगड तहसिलदार कार्यालयात पुरवठा शाखेत फिर्यादी शिवराज यमनुर चव्हाण अव्वल कारकून म्हणून नेमणुकीस होते. दिनांक ४ मार्च २०२१ रोजी ते आपल्या कार्यालयात काम करत असताना दुपारी १२.४५ वाजण्याचा सुमारास ई. सेवा केंद्र चालक रामचंद्र अनाजी शिर्के (आरोपी नं. २) हा तेथे आला. त्याच्या पाठोपाठ अचानकपणे पाच फूट उंचीचा राखाडी रंगाचा फुल शर्ट परिधान केलेला व तोंडास काळ्या रंगाचे मास्क बांधलेला उजव्या हातात प्लास्टिक पिशवी घेऊन एक अज्ञात इसम (आरोपी नं. १) फिर्यादीच्या खुर्चीच्या बाजूला आला. त्यावेळी शिर्के याने त्या व्यक्तीस सांगितले कि, ‘थांब थांब मी बाहेर जातो’ व तो बाहेर गेला. तो जाताक्षणी अज्ञात इसमाने प्लास्टिक पिशवीतून आणलेल्या सुकलेल्या शेंगा फिर्यादीच्या डोक्यावर ओतून पसार झाला. अज्ञात इसमाचा पाठलाग करण्यात आला. परंतु तो सापडला नाही. म्हणून देवगड पोलीसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भा.द.वि. कलम ३५३, ३३२,१०९ सह ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला.
याकामी फिर्यादी पक्षाने एकूण ५ साक्षीदार तपासले. न्यायालयासमोर अज्ञात आरोपी (आरोपी नं. १) यास कोणाही साक्षीदाराने ओळखले नाही. कारण अज्ञात व्यक्तीच्या तोंडावर मास्क होता. तपासी अंमलदारांनी ओळख परेड घेतली नाही. फिर्यादीच्या अंगावर खरोखरीच कोणीच खाजकुयलीच्या बिया टाकल्या हे न्यायालयासमोर स्पष्ट होण्यासाठी फिर्यादीचे कपडे जप्त करून ते न्यायवैज्ञानिक शाखेकडे पाठविण्यात आले नाहीत. वैद्यकीय अधिकाऱ्यानी जेव्हा फिर्यादीस तपासले त्यावेळी त्याच्या अंगावर कोणतीही जखम नसल्याचे स्पष्ट केले. तत्कालीन आमदार व सध्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र देवून फिर्यादी हा उघडपणे रेशनकार्डाचे काम करण्यासाठी पैशाची मागणी करून जनतेला हैराण करून सोडत आहे, त्यामुळे त्याची बदली करण्यात यावी, असे जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांना दिनांक ३० जुलै २०२४ रोजी कळविलेले होते.
या गोष्टी आरोपींतर्फे वकिलांनी मे. न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. म्हणून अति. सत्र न्यायाधीश, सानिका जोशी यांनी सबळ पुराव्याअभावी आरोपींची मुक्तता केली. आरोपीतर्फे अॅड. अजित भणगे, अॅड. मिहीर भणगे, अॅड. स्वप्ना सामंत, अॅड. सुनिल मालवणकर, अॅड. तेजाली भणगे व अॅड. आशुतोष कुळकर्णी यांनी काम पाहिले.

You cannot copy content of this page