यात्रेनंतर आंगणेवाडीत राबविली स्वच्छता मोहीम…

⚡मालवण ता.२५-:
आंगणेवाडी येथे श्री देवी भराडीच्या यात्रोत्सवानंतर जिल्हा प्राशासन व आंगणेवाडी विकास मंडळ मुंबई यांच्या वतीने श्री देवी भराडी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत नगरविकास विभागाचे अधिकारी/कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, सविता आश्रम व आंगणेवाडी ग्रामस्थ इतर स्वयंसेवक यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत यात्रेदरम्यान आंगणेवाडी परिसरात निर्माण झालेला कचरा गोळा करत स्वच्छता केली.

आंगणेवाडी येथे यात्रेच्या निमित्ताने व्यावसायिकांद्वारे हॉटेल, गृहपयोगी साधने, कपडे, भांडी, खेळाचे साहित्य, खाद्यपदार्थ, शीतपेय असे शेकडो स्टॉल उभारण्यात आले होते. लाखोंचा जनसागर आणि शेकडो स्टॉल इत्यादीमुळे मोठ्या प्रमाणात कचराही निर्माण झालेला होता. यात्रा संपन्न झाल्यानंतर तेथील परिसर स्वच्छ करण्याच्या सूचना पालकमंत्री नितेश राणे तसेच जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिल्या होत्या. तसेच आंगणे ग्रामस्थ मंडळाकडूनही स्वच्छता मोहिमेचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार सोमवारी आंगणेवाडी येथे स्वच्छता मोहिम संपन्न झाली.

या स्वच्छता मोहिमेत मालवण नगरपरिषद, सावंतवाडी नगरपरिषद, वेंगुर्ला नगरपरिषद, कणकवली नगरपंचायत, देवगड – जामसंडे नगरपंचायत व कुडाळ नगरपंचायतचे एकूण ४५ कर्मचारी तसेच सविता आश्रमचे स्वयंसेवक, दादासाहेब वराडकर कॉलेज, कट्टाचे ६० विद्यार्थी, आर. पी. बागवे हायस्कूलचे २० विद्यार्थी, प्राथमिक शाळा, वरवडेचे ५ विद्यार्थी तसेच बहुसंख्य आंगणेवाडी ग्रामस्थही सहभागी झाले. कचरा वाहतुकीसाठी नगरविकास विभागाकडून ७ घंटागाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या. मालवण नगरपरिषद कार्यालयीन अधीक्षक महेश परब, सावंतवाडी नगपरिषद स्वच्छता निरीक्षक पांडुरंग नाटेकर, कणकवली नगरपंचायत स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, आंगणेवाडी विकास मंडळाचे कार्याध्यक्ष सिताराम आंगणे व बिळवस ग्रामपंचायत, ग्रामसेवक युगल प्रभुगावकर यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. सिताराम आंगणे व ग्रामसेवक युगल प्रभुगावकर यांनी कचरा संकलनासाठी आवश्यक पिशव्या, झाडू तसेच मास्क उपलब्ध केले. स्वच्छता निरीक्षक पांडुरंग नाटेकर, विनोद सावंत, ग्रामसेवक युगल प्रभुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबवून जमा झालेला कचरा पिशव्यांमध्ये भरून नगरपालिकांच्या घंटा गाड्यांतून ग्रामपंचायत व आंगणेवाडी विकास मंडळाने नेमून दिलेल्या जागेत एकत्र जमा करण्यात आला. या मोहिमेत सुमारे ५ टन पेक्षा जास्त कचरा संकलित करण्यात आला.

आंगणेवाडी विकास मंडळ, मुंबई यांच्याकडून स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्यांसाठी अल्पोपहार तसेच पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. तसेच आंगणेवाडी विकास मंडळाचे कार्याध्यक्ष बाळा आंगणे, कमलाकर आंगणे, समीर आंगणे, दिनेश आंगणे, प्रसाद आंगणे, सचिन आंगणे, बाळकृष्ण आंगणे यांनी मोहिमेतील सर्वाना श्री भराडी देवीचा प्रसाद व पेन वाटप करून आभार मानले. त्याचप्रमाणे पालकमंत्री नितेश राणे व जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्यासह नगरविकास विभागाच्या सहकार्याबद्दल जिल्हा सहआयुक्त विनायक औंधकर, मालवण नगरपालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे व सर्व सहभागी नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांचेही आंगणे विकास मंडळ व ग्रामस्थांकडून आभार मानण्यात आले.

You cannot copy content of this page