कुणाल किनळेकर:नितेश राणेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा मनसेतर्फे निषेध..
⚡कुडाळ ता.२५-: महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत घेतलेल्या मंत्रीपदाच्या शपथीचा बंदर विकास तसेच मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे यांना विसर पडलाय की काय, असा सवाल मनसे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी उपस्थित केला आहे. संविधानाचा विसर पडलेल्या मंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा मनसे सिंधुदुर्गच्या वतीने जाहीर निषेध करीत असल्याचे मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री. किनळेकर म्हणतात, काही दिवसांपूर्वी ओरोस येथील भारतीय जनता पक्षाच्या मेळाव्यात तसेच सावंतवाडी तालुक्यातील मेळाव्यात पालकमंत्री नितेश राणे यांनी जिथे भारतीय जनता पक्षाचा सरपंच नाही, त्या ठिकाणी विकास निधी देणार नसल्याचे वक्तव्य केले होते. आमदार नितेश राणे यांना महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणून नि:पक्षपाती राज्यातील सर्व घटकांना न्याय देण्याच्या घेतलेल्या शपथेचा विसर पडलेला दिसत आहे. मंत्री नितेश राणे यांनी केलेले वक्तव्य सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांना मान्य आहे का? एरवी पक्षाचा प्रवक्ता म्हणून प्रत्येक वेळी भूमिका मांडणारे दिपक केसरकर यावेळी गप्प का? अशाप्रकारे जर सत्ताधारी म्हणून विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधीना विकास निधीबाबत दुजाभाव कोणी दाखवत असेल तर त्याला यापूर्वी दाखविलेलेच आहे. आता पुन्हा एकदा भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनताच योग्य उत्तर देईल, असे कुणाल किनळेकर यांनी शेवटी म्हटले आहे.
