दिग्दर्शक श्रीकांत प्रभाकर यांनी माहिती:२८ फेब्रुवारी रोजी वेंगुर्ल्यात होणार प्रीमियर..
कुडाळ : संपूर्णपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात चित्रित झालेला, स्थानिक कलाकारांच्या मुख्य भूमिका असलेला, अस्सल मालवणी भाषेच्या लहेजाने सजलेला आणि अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सादर झालेला आणि पुरस्कारप्राप्त ठरलेला ‘भेरा’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. येत्या २८ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजता वेंगुर्ल्याच्या नाटककार मधुसूदन कालेलकर नाट्यगृहामध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे. सध्या फक्त सिंधुदुर्गातील नाट्यगृहांमध्ये हा चित्रपट रिलीज होणार असून संपूर्ण महाराष्टात २१ मार्च २०२५ पासून हा चित्रपट पाहता येईल, अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीकांत प्रभाकर यांनी दिली.
कुडाळ येथील हॉटेल लाईम लाईट येथे पत्रकार आणि यु ट्यूब इन्फ्लुएन्सर यांच्यासाठी या चित्रपटाचा खास शो आयोजित करण्यात आला होता, त्यानंतर श्रीकांत प्रभाकर आणि चित्रपटाच्या टीमने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ज्यांच्या ‘साकव’ या कथेवर हा चित्रपट बेतलेला आहे आणि जे या चित्रपटाचे पटकथा आणि संवाद लेखक सुद्धा आहेत ते प्रसाद खानोलकर (पिंगुळी), चित्रपटात ‘विष्णू’ हि मूक बधिर मुलाची मध्यवर्ती भूमिका साकारणारे देवगड येथील दीपक जोईल, ‘अनीबाई’ हि मध्यवर्ती भुमीका साकारणाऱ्या कुडाळच्या सौ. श्रद्धा खानोलकर, तसेच प्रमोद कोयंडे (देवगड), प्राजक्ता नेरूरकर (नेरुर), आकांक्षा खोत (म्हापण), गौरव राऊळ (वेंगुर्ला), विवेकानंद वाळके (कणकवली) याच बरोबर या टीम मधील तन्मयी कांबळेकर, भैरवी कुलकर्णी आणि सुहास खानोलकर असे चित्रपटातील कलाकार आणि चित्रपटाची टीम उपस्थित होती.
यावेळी बोलताना श्रीकांत प्रभाकर म्हणाले, त्यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबतच पटकथा, संवाद लेखन, कला दिग्दर्शन हि बाजू सांभाळली आहे. श्री वैजप्रभा चित्र निर्मित ‘भेरा’ हा असा पहिला मालवणी चित्रपट आहे जो नॅशनल आणि इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये सादर झाला आहे. चेन्नई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटाचा प्रीमियर झाला, पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये पहिल्या जवळजवळ ५० मराठी चित्रपटातून केवळ सातच मराठी चित्रपट निवडले जातात. त्यामध्ये ‘भेरा’ ची निवड झाली. त्यामध्ये बेस्ट डिरेक्टर आणि बेस्ट आर्ट डिरेक्टर अशी दोन पारितोषिके या चित्रपटाला मिळली. सगळ्यात अभिमानाचा क्षण म्हणजे असा होता की, महाराष्ट्र शासन दरवर्षी फ्रान्समध्ये होणाऱ्या कान्स फिल्म मार्केटसाठी मराठीतील तीन चित्रपट पाठवते. त्यामध्ये ‘भेरा’ चित्रपटाचा समावेश होता. तसेच जर्मनीमध्ये होणाऱ्या स्टुटगार्ड एशियन फिल्म फेस्टिवलमध्ये सुद्धा हा चित्रपट दाखवण्यात आला. अलीकडेच झालेल्या २१ व्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हल मध्ये श्रद्धा खानोलकर याना ‘अनीबाई’ च्या भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेत्रींचे पारितोषिक मिळाले. असा हा फेस्टिव्हलचा जवळजवळ दीड वर्षाचा प्रवास करून ‘भेरा’ हा चित्रपट आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला असल्याचे श्रीकांत प्रभाकर यांनी सांगितले.
२८ फेब्रुवारीपासून सिंधुदुर्गातील नाट्यगृहांमध्ये हा चित्रपट सुरुवातीला प्रदर्शित होणार आहे. पूर्णपणे मालवणी चित्रपट, स्थानिक कलाकार आणि येथील लोकेशनवर चित्रित झालेला हा चित्रपट आहे. तसेच सिंधुदुर्गात नाट्यगृहांचा पर्याय जास्त उपलब्ध आहे. त्यामुळे हा चित्रपट सुरुवातीला नाट्यगृहात दाखवण्यात येणार आहे. प्रत्येक शुक्रवार, शनिवार आणि रविवार प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हा चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. वेंगुर्लेपासून याची सुरुवात होणार आहे. नंतर सावंतवाडी, कुडाळ, देवगड, मालवण, कणकवली येथे हा चित्रपट दाखविला जाणार आहे. आणि त्याच्यानंतर साधारण तीन आठवड्यांनी २१ मार्चपासून महाराष्ट्रातील मल्टिफ्लेक्स मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे श्रीकांत प्रभाकर म्हणाले.
हा चित्रपट म्हणजे आमच्या टीम मधील प्रत्येकाचे स्वप्न आहे. पूर्ण टीमची हि पहिली फिल्म आहे. काही तंत्रज्ञ सोडले तर यातील प्रत्येक अभिनेता, अभिनेत्री, तंत्रज्ञ या सर्वांची हि पहिलीच फिल्म आहे. अनेक मान्यवरांनी या चित्रपटाला गौरविले आहे. दाद दिली आहे. त्यामुळे हा पूर्णपणे मालवणी मातीतील, स्थानिक कलाकार आणि स्थानिक लोकेशन असलेला हा चित्रपट सर्वानी पहावा असे आवाहन श्रीकांत प्रभाकर यांनी केले.
यावेळी लेखक प्रसाद खानोलकर, मुख्य भूमिका साकारणारे दीपक जोईल आणि सौ. श्रद्धा खानोलकर, तसेच अन्य कलाकारांनी सुद्धा सिनेमाच्या चित्रीकरणाबाबतचे आपले अनुभव सांगून सर्वानी हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले.
