मेढा राजकोट रहिवाशांची मागणी..
⚡मालवण ता.०२-:
मालवण येथील राजकोट किल्ला पायथ्यालगतची शासकीय जमीन (शेरे जमीन) मध्ये सुशोभीकरण व पर्यटकांसाठी प्रसाधनगृह, बैठक व्यवस्था इत्यादी सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी मागणी मेढा राजकोट येथील रहिवाशांनी तहसीलदार वर्षा झालटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राजकोट येथील रहिवाशांनी तहसील कार्यालयात तहसीलदार वर्षा झाल्टे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. राजकोट येथील राजकोट किल्ला हा भग्न अवस्थेत होता. ४ डिसेंबर २०२३ रोजी मालवणात साजरा झालेल्या नेव्ही-डेनिमित्त राजकोट किल्ल्याचे सुशोभीत बांधकाम करून त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला. या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. राजकोट येथे किल्ला बांधकाम व छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधकाम झाल्यानंतर मेढा-राजकोट येथे राजकोट किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची वर्दळ वाढतच आहे. या निमित्ताने स्थानिक रहिवाशांना रोजगाराचे साधनही निर्माण झाले आहे. पर्यटक मोठ्या संख्येने राजकोट किल्ला पाहण्यासाठी येत आहेत. राजकोट किल्ला पाहून झाल्यानंतर पर्यटकांना विश्रांतीसाठी किल्ला परिसरात सोय नाही यासाठी राजकोट किल्ल्याच्या पायथ्याशी शासनाची पडिक जमीन (शेरे जमीन) असून त्या जमिनीचे सुशोभीकरण करून तेथे उद्यान बनविल्यास तसेच पर्यटकांना विश्रांतीसाठी बसण्याची व प्रसाधनगृहाची व्यवस्था केल्यास पर्यटनाला फायदा होईल व राजकोट किल्ल्याचा परिसर सुशोभित दिसेल. तसेच उद्यानात पर्यटक अधिक वेळ थांबल्यास, त्याचा परिणाम व्यवसाय वाढीवर होईल, असे रहिवाशांनी निवेदनात म्हटले आहे. राजकोट किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या (शेरे) जमिनीमध्ये सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभाग व मुख्याधिकारी, नगरपालिका यांना संयुक्त सूचना द्याव्यात, अशी राजकोट मेढा येथील स्थानिक नागरिक म्हणून प्रशासनास आमची विनंती आहे, असेही रहिवाशांनी निवेदनात म्हटले आहे.
