दिल्लीत ॲमेझाॅन करिअर फ्युचर समिटमध्ये प्रकल्प सादरीकरणची संधी:देशातील १७ प्रकल्पात निवड..
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर प्राथमिक शाळा नंबर १च्या तीन विद्यार्थिनी आणि त्यांच्या शिक्षिकेचा दिल्लीत गौरव करण्यात आला आहे. वैदेही वातकर, महिका घाडी आणि रितू सावंत असे त्या विद्यार्थिनींची नावे असून प्रीती प्रदीप नारकर या त्यांच्या मार्गदर्शक शिक्षिका आहेत. सध्या त्या शिक्षिका कुडाळ तालुक्यातील कवठी नं १ या शाळेत अध्ययनाचे काम करत आहेत. त्यांना दिल्ली येथील पंचतारांकित हाॅटेल ताजमध्ये झालेल्या ॲमेझाॅन करियर फ्युचर समिट 2025 या देशपातळीवरील कार्यक्रमात प्रकल्प सादरीकरण करण्याची संधी मिळाली.
या कार्यक्रमाला संपूर्ण देशातून विविध राज्यातून शाळांची निवड करण्यात आली. त्या शाळांचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. महाराष्ट्रातून ज्या दोन शाळांची निवड झाली सिंधुदुर्ग जिल्हयातील जि.प.शाळा कुणकेश्वर ता देवगड शाळेची निवड करण्यात आली ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.
अपार मेहनत व सृजनशीलतेच्या जोरावर “LFE,CEL, Amazon Future Engineering” आयोजित राज्यस्तरीय CS हॅकथॉन स्पर्धेत टॉप 10 मध्ये येण्याचा मान जि प शाळा कुणकेश्वर नंबर एक या शाळेने 2024 मध्ये पुणे येथे झालेल्या स्पर्धेत मिळवला होता. या महत्त्वाच्या विजयामुळे त्यांना दिल्लीत झालेल्या भव्य आणि प्रतिष्ठित “अॅमेझॉन कार्निव्हल” Amazon Edu Summit या कार्यक्रमासाठी विशेष आमंत्रण मिळाले. विशेष म्हणजे हे विद्यार्थी व त्यांच्या शिक्षिका यांनी दिल्ली येण्याजाण्याचा विमान प्रवास, निवास आणि इतर सोयी-सुविधांचा खर्च लीडरशीप ऑफ इक्विटी संस्था ,अमेझाॅन फ्यूचर इंजिनिअर आणि कोड टू एनहान्स संस्था, यांचेकडून करण्यात आला.
गेल्यावर्षी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग, शिक्षण विभाग सिंधुदुर्ग Code to enhance learning, leadership for equity, Amazon future engineer यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय हॅकाथाॅन स्पर्धेत शाळा व विद्यार्थी यांनी कोडींगचा वापर करून स्थानिक समस्या कशा सोडविता येतील या विषयावर प्रतिकृती सादर करण्याचे आवाहन करण्यात आले. यामध्ये जि.प.शाळा कुणकेश्वर शाळेच्या विद्यार्थी व शिक्षिका सौ प्रीती नारकर यांनी सहभाग घेतला आणि या संघाची निवड राष्ट्रीय पातळीवर झाली. त्यामुळे दिल्ली येथील राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होण्याचा बहुमान मिळाला. याबद्दल सिंधुदूर्ग डाएट व जि.प.शिक्षण विभागाचे शिक्षिका सौ प्रीती नारकर यांनी आभार मानले.
प्रोजेक्टचे वैशिष्टय
कोडिंगचा उपयोग करून आपण दैनंदिन जीवनातील समस्या अशाप्रकारे सोडवू शकतो यावर जि.प.शाळा कुणकेश्वर नं १ च्या विद्यार्थीनी वैदेही हेमंत वातकर, महिका दीपक घाडी, रितू आनंद सावंत, यांनी शिक्षिका सौ प्रिती नारकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिकृती सादरीकरण केली. याची दखल अमेझाॅन फ्युचर इंजिनिअर व कोड टू एनहान्स लर्निंग संस्था व लीडरशीप फाॅर इक्विटी संस्था यांनी घेत देशातील सर्वोत्तम १७ शाळांच्या प्रतिकृतीमध्ये समावेश केला. ही बाब सिंधुदूर्गसाठी खुपच अभिमानाची आहे.
दरम्यान दिल्ली येथील कार्यक्रमावरून विमानाने पुन्हा सिंधुदुर्गात दाखल झालेल्या कुणकेश्वरच्या या तीन विद्यार्थीनी व शिक्षिका सौ प्रीती नारकर व लीडरशीप फाॅर इक्विटी संस्था पुणेचे वरिष्ठ प्रकल्प संचालक अमित गवळे यांचे पुष्पगुच्छ देवून कुडाळ येथे एस आर दळवी फाऊंडेशन (I) सिंधुदुर्गच्यावतीने जिल्हाध्यक्ष सचिन मदने यांनी अभिनंदन केले.
दरम्यान कोडींगचा हॅकाथाॅन प्रकल्प यावर्षीपासून महाराष्ट्रात सुरू करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे , पायजाम फाऊंडेशन यांचेमार्फत यावर्षी कोडींग हॅकाथाॅन प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रात सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील निवडक शिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे.
या विद्यार्थ्यांना त्या प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका सौ सुप्रिया सनये, वर्गशिक्षिका पाटील मॅडम, माजी शिक्षिका आरती घाडी, मुख्याध्यापक श्री लवटे सर यांचेही मार्गदर्शन लाभले.
