मानसिक आरोग्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता महत्त्वाची-:डॉ. रुपेश पाटकर…

⚡मालवण ता.०८-: भावनिक आरोग्य हे सामूहिक असते, त्यामुळे एकमेकांचे भावनिक आरोग्य सांभाळले पाहिजे, यासाठी भावनिक बुद्धिमत्ता आवश्यक असून ती विकसित केली पाहिजे. आपल्या मानसिक आरोग्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता महत्वाची आहे, असे प्रतिपादन मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांनी येथे बोलताना केले.

मालवण येथील युथ बिट्स फॉर क्लायमेट आणि इकोमेट्स व स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा आजीवन अध्यायान व विस्तार विभाग यांच्या वतीने मानसिक आरोग्य या विषयावरती मनोविकारतज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांचे संवाद सत्र सिंधुदुर्ग महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते. यावेळी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. सुमेधा नाईक यांनी केले. तर श्रीमती बर्डे यांनी डॉ. पाटकर यांचे स्वागत केले. इकॉमेट्सचे सदस्य आणि महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या संवाद सत्रामध्ये सहभाग घेतला.

या संवाद सत्राच्या सुरुवातीला गोरक्ष परब यांनी चरख्याच्या सहाय्याने कताई कशी करावी, याचे प्रात्यक्षिक दाखवले. सूतकताई करताना आपोआप ध्यानधारणेचा अनुभव आपणास घेता येतो, मनाची एकाग्रता साधता येते असे डॉ. रुपेश पाटकर यांनी स्पष्ट केले. डॉ. पाटकर यांनी ट्रांजेक्शन एनालिसिस म्हणजेच रोजच्या घटनांमध्ये वर्तनामध्ये माणसाचा बालक चालक आणि पालक कसे कार्यरत असतात आणि प्रतिक्रिया देत असतात, याची उदाहरणे दिली. पालक म्हणून मुलांना शिकवत असताना डीलेड ग्रॅटिफिकेशनची सवय लावणे, नकार पचवायला शिकणे, अपमान बसवायला शिकणे, श्रमाची प्रतिष्ठा मानता येणे या मूल्यांचे महत्त्व सांगितले. पौगंडावस्थेतील मुलांशी संवाद साधताना त्यांचे म्हणणे ऐकून घेणे, त्यांना समजून घेणे, त्या वयातील खट्याळपणा जिवंत ठेवणे, त्यांना स्वतःच्या क्षमता ओळखायला लावून प्रॉब्लेम सॉल्विंग, निर्णय क्षमता, क्रिटिकल आणि क्रिएटिव्ह थिंकिंग ही कौशल्ये शिकवणे गरजेचे आहे. भावनिक बुद्धिमत्ता विकसित करण्याचे घटक म्हणजे भावना ओळखणे, आपली भावना हाताळणे, व्यक्त करणे, भावनेचा स्वीकार करणे आणि विचार बदलण्यासाठी प्रयत्न करणे, या बाबत डॉ. पाटकर यांनी विविध उदाहरणे देत मार्गदर्शन केले.

प्रेम आणि आकर्षण यातील फरक समजून घेणे गरजेचे आहे. प्रेम करणे म्हणजे ज्याच्या वर प्रेम करतो त्या व्यक्तीला पूर्ण विकसित होऊ देणे
कोणत्याही व्यक्तीच्या समस्येचे क्षुल्लकीकरण करू नये, इमोशनली डिस्टर्ब असताना कोणताही निर्णय घेऊ नये, सल्ला देणाऱ्या व्यक्तीच्या मनातील तुमची प्रतिमा जपण्याचा प्रयत्न करू नये, भावना प्रेरित करता येतात, त्यामुळे आपल्यावर कोणी मुद्दाम भावना थोपत असेल तर त्याबाबत सावध राहावे असे डॉ. पाटकर यांनी सांगितले. भावनिक बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी विविध गोष्टींचा उल्लेख डॉ. पाटकर यांनी छोट्या छोट्या कथा, घटना, व्यवहार आणि प्रात्यक्षिक यातून स्पष्ट केला. चारूशीला देऊलकर यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page