आमदार निलेश राणे:आगामी काळात होणाऱ्या स्थानिक निवडणुकीत शिवसेना ताकदीने उतरणार..
⚡मालवण ता.०८-: शिवसेना पक्ष वाढीच्यादृष्टिकोनातून उद्यापासून गाव तिथे शिवसेना शाखा अभियान राबविण्यात येणार असून या अभियानांतर्गत गावातील संघटना,
गावातील बूथ सक्षम करण्यासाठी तसेच पक्षाला प्रत्येक बूथ वर जास्तीत जास्त मतदान कसे वाढेल यासाठी विशेष प्रयत्न केले जातील आगामी काळात येऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायतच्या निवडणुकांमध्ये शिवसेना ताकदीने उतरणार आहे येणाऱ्या काळात या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शिवसेना व शिवसेनेचा झंजावात दिसून येईल असा दृढ विश्वास मालवण कुडाळचे आमदार निलेश राणे यांनी मालवण येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला
मालवण येथील नीलरत्न या निवासस्थानी आमदार निलेश राणे यांची पत्रकार परिषद झाली यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा संघटक माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, आनंद शिरवलकर, किसन मांजरेकर आदी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत बोलताना आमदार श्री निलेश राणे म्हणाले , गाव तिथे शिवसेना अभियान पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून उद्यापासून सुरू करतोय राज्यामध्ये महायुतीची सत्ता आहे शिवसेनेचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविले जाणार आहे सिंधुदुर्गात शिवसेनेचे दोन आमदार आहेत आणि त्या अनुषंगाने जनतेची आणि इतर पक्षाच्या लोकांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक होत चाललेला आहे जो पूर्वी होता आता अजून त्याला बळ मिळालेले आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अनेक पक्ष प्रवेश होणार आहेत गाव तिथे शाखा अभियानात गावातील संघटना, गावातील बूथ सक्षम करण्यासाठी पक्षाला प्रत्येक बूथ वर जास्तीत जास्त मतदान कसे वाढेल यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असे सांगून ते म्हणाले, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत हे अभियान राबविणार आहेत मोठ्या ताकदीने आम्ही यामध्ये उतरणार आहोत येणाऱ्या काळात शिवसेनेची ही ताकद आपल्याला दिसेलच असे ते म्हणाले
ते पुढे म्हणाले, कोणत्याही क्षणी होणाऱ्या निवडणुकीला शिवसेना तयार आहे आमचे काम बघून, आमच्या सरकारचे, नेत्यांचे काम बघून अनेक जण आमच्याकडे यायला इच्छुक आहेत, ते थांबलेले आहेत कुंपणावर आहे त्या सगळ्यांना घेऊन पक्ष वाढीसाठी आम्ही काम करणार आहोत असे सांगतानाच निलेश राणे म्हणाले, या जिल्ह्यात शिवसेना पक्ष वाढीला वाव आहे तो येणाऱ्या काळात दिसेलच मुख्यमंत्री पदाच्या काळात एकनाथ शिंदे यांनी गेल्या अडीच वर्षात अनेक योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. त्याचा फायदा राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होण्यासाठी झाला आहे. अनेकांना या पक्षात सहभागी होत काम करायचे आहे अशी तळागाळातल्या प्रत्येकाची भावना तयार झाली आहे. या भावनेचा आदर करूनच येणाऱ्या काळामध्ये आम्ही शिवसेनेला गावापर्यंत पोहोचविण्याचे काम करणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जे अभिप्रेत आहे तसा पक्ष आम्ही या जिल्ह्यात वाढविण्याचे काम करण्याबरोबरच सर्व निवडणुका मोठ्या ताकदीने लढवून त्यात यश मिळवू असा विश्वास श्री राणे यांनी व्यक्त केला.
