जिजामाता मंडळातर्फे कथातंत्र कार्यशाळा संपन्न…

⚡मालवण ता.२०-: जिजामाता मंडळ मालवण आयोजित कथातंत्र कार्यशाळा मालवण भरड येथील श्री शिवाजी वाचन मंदिराच्या सभागृहात संपन्न झाली. यावेळी प्रमुख अतिथी महेश धामापूरकर यांच्यासह इतर मान्यवरांनी मार्गदर्शन करत कथाकथनाची विविध तंत्रे समजावून सांगितली.

या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुभाष दिघे, जिजामाता मंडळच्या अध्यक्षा सौ. गार्गी कुशे, प्रमुख पाहुणे महेश धामापूरकर, काळे आजी शिशुविहार बालवाडीच्या संचालिका सौ. मालती काळे आदी उपस्थित होते. ईशस्तवन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. मान्यवरांचा परिचय श्रीधर काळे यांनी करून दिला.

यावेळी महेश धामापूरकर यांनी ओघवत्या शैलीत कथाकथनाची तंत्रे पालक वर्गाला समजावून सांगितली. काही कथा सादर करत कथेचा उद्देश, निवड, संवाद, नाट्यीकरण, अद्भुतता, रस आदी अनेक तंत्रांबाबत धामापूरकर यांनी मार्गदर्शन केले. तर अक्षय सातार्डेकर यांनी ‘चोर सापडला’, आणि ‘खरा विजय’ या दोन कथा सादर केल्या. पालकवर्गातून सौ. सोनाली सावंत यांनी बडबडगीत साभिनय सादर केले. तर कु. सार्थक करंजेकर याने वाटाणा फुटाणा हे बडबडगीत सादर केले. तर अध्यक्षीय भाषणात डॉ. सुभाष दिघे यांनी कार्यक्रमाचा आढावा घेत मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन श्रीधर काळे यांनी केले. यावेळी पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

You cannot copy content of this page