सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर्स असोसिशनचा मालवण तालुकास्तरीय मेळावा संपन्न…!

⚡मालवण ता.०६-: सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर्स असोसिशनची मालवण तालुकास्तरीय वार्षिक मेळावा मालवण येथील नगर वाचन मंदिरच्या सभागृहात अध्यक्ष एस. ए. डिसोजा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. शासनाकडून अपेक्षित असलेल्या पेन्शन विषयक सुधारणा आणि त्याची अंमलबजावणी या मुख्य विषयावर या सभेत चर्चा करण्यात आली. तसेच पेन्शनर संघटना अधिक बळकट करण्याचे ठरविण्यात आले.

या मेळाव्यात बी. जी. घाडी यांनी सर्वांचे स्वागत केले. संघटनेचे सचिव पी. एल. मोहिते यांनी संघटना बांधणी, नवीन सभासद नोंदणी आदी विषयांवर सविस्तर विचार मांडून संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन केले. सातारा येथे अखिल भारतीय संघटनेच्या संपन्न झालेल्या वार्षिक अधिवेशनाचा वृत्तांत यावेळी सादर करण्यात आला. एम. डी. जोशी यांनी पेन्शनच्या नवीन ऑर्डरची माहिती दिली. तसेच शारीरिक, मानसिक दृष्ट्या अपंग असलेल्या मुला मुलींना मिळणाऱ्या सवलती, घटस्फोटीत/ विधवा/ अविवाहित मुलींना मिळणाऱ्या पेन्शनबाबत, ८० वर्षानंतर मिळणाऱ्या अधिक पेन्शन बाबत माहिती दिली. एस. ए. डिसोजा यांनी संघटनेचा जमाखर्च मांडून आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन आर्थिक दृष्ट्या संघटना अधिक सक्षम करण्याचे आवाहन केले.

यावेळी एस. व्ही. हडकर, एम. डी. जोशी यांचा ८० वर्षे वय पूर्ण केल्याबद्दल शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. बी. जी. घाडी यांनी संघटना वाढीच्या दृष्टीने आपले विचार मांडले. यावेळी के. व्ही. चव्हाण, एस. व्ही. हडकर, एस. के. भोगले, एस. एच. वेर्लेकर, ए. बी. वाघमारे आदी पदाधिकारी यांच्यासह बहुसंख्य पेन्शनर सदस्य उपस्थित होते.

You cannot copy content of this page