⚡मालवण ता.१२-: महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर प्रचार सभा दि. १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता मालवण येथील टोपीवाला हायस्कूलच्या मैदानावर होणार आहे. या सभेसाठी टोपीवाला हायस्कुल येथे भव्य स्टेज उभारले असून सुमारे ३ हजार लोकांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, या सभेचा ट्रेलर जाहीर करण्यात आला असून ‘महाराष्ट्र स्वाभिमान सभा’ असे या सभेस संबोधण्यात आले आहे. तसेच ‘स्वराज्याचा स्वाभिमान जपूया, महाराष्ट्र धर्म वाढवूया’ असेही म्हटले आहे, अशी माहिती ठाकरे शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिली.
महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार वैभव नाईक यांच्या प्रचारासाठी मालवण कुडाळ मधील कार्यकर्त्यांनी जोर लावला आहे. यातच या मतदार संघांसाठी उद्धव ठाकरे यांची प्रचार सभा मालवण येथे आयोजित करण्यात आली असून यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. या सभेची जोरदार तयारी टोपीवाला हायस्कुलच्या मैदानावर करण्यात येत असून ६० ते १०० मान्यवर बसतील एवढ्या क्षमतेचे स्टेज उभारण्यात आले आहे. तर स्टेजसमोर ३ हजार लोक बसतील एवढ्या क्षमतेची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. सभेसाठी सर्व सोयी सुविधा तैनात करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. या सभेसाठी उद्धव ठाकरे यांच्या समवेत महाविकास आघाडी मधील ठाकरे शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित उपस्थित राहणार आहेत.
आमदार वैभव नाईक सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत जिंकण्याच्या ताकदीने उतरले असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात टोपीवाला हायस्कूलच्या मैदानावर होणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असल्याचे उबाठा शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी सांगितले. जाहीर प्रचार सभा पाहून विरोधकांना त्यांची जागा दिसून येणार आहे. ही सभा नसून आमचा विजयोत्सव असणार असल्याचेही खोबरेकर यांनी सांगितले.
