Headlines

जिल्हास्तरीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत कुडाळ हायस्कूलचे वर्चस्व

मालवण (प्रतिनिधी)

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील जिल्हास्तरीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल, ओरोस येथे उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धांमध्ये १४, १७ व १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या गटांचा सहभाग होता. या स्पर्धेत विविध गटात कुडाळ हायस्कुलने वर्चस्व राखले.

स्पर्धेचे उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडा अधिकारी शीतल शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा हौशी सॉफ्टबॉल असोसिएशनचे सचिव अजय शिंदे, कमलेश गोसावी, सुदिन पेडणेकर, निशाकांत पराडकर, विजय मयेकर, संदेश तुळसनकर यांच्यासह विविध शाळांचे क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक व खेळाडू उपस्थित होते.

स्पर्धेच्या पहिल्या सामन्याची नाणेफेक श्री कमलेश गोसावी प्रसिद्ध कवी यांच्या शुभहस्ते करण्यात आली. या स्पर्धेत कुडाळ हायस्कूल, कुडाळ, सरस्वती विद्यामंदिर, कुडासे, विद्यामंदिर कणकवली तसेच यशवंतराव चव्हाण आदर्श माध्यमिक विद्यालय, आचिर्णे या शाळांच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात कुडाळ हायस्कूलने प्रथम, तर विद्यामंदिर कणकवलीने द्वितीय क्रमांक मिळविला. १४ वर्षांखालील मुलींच्या गटात सरस्वती विद्यामंदिर, कुडासेने प्रथम क्रमांक पटकावला. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात सरस्वती विद्यामंदिर, कुडाळ प्रथम, विश्वामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली द्वितीय, तर कुडाळ हायस्कूल तृतीय ठरले. १७ वर्षांखालील मुलींच्या गटात सरस्वती विद्यामंदिर, कुडासेने प्रथम क्रमांक मिळविला. १९ वर्षांखालील मुलांच्या गटात कुडाळ हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कुडाळ प्रथम, सरस्वती विद्यामंदिर, कुडासे द्वितीय, तर यशवंतराव चव्हाण आदर्श माध्यमिक विद्यालय, आचिर्णे तृतीय ठरले. १९ वर्षांखालील मुलींच्या गटात कुडाळ हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने प्रथम, तर यशवंतराव चव्हाण आदर्श माध्यमिक विद्यालय, आचिर्णेने द्वितीय क्रमांक मिळविला.

यावेळी बोलताना अजय शिंदे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सॉफ्टबॉल या खेळातून सर्वाधिक राष्ट्रीय खेळाडू निर्माण झाले असून अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके मिळविली आहेत. त्यामुळे सॉफ्टबॉलमध्ये राष्ट्रीय स्तरावर यश मिळविण्याचे मोठे सामर्थ्य जिल्ह्यातील खेळाडूंमध्ये आहे. विद्यार्थ्यांनी केवळ शालेय स्पर्धांपुरते मर्यादित न राहता सॉफ्टबॉल संघटनेच्या विविध स्पर्धांमध्येही सहभागी व्हावे. अशा स्पर्धांमधून खेळाडूंना अधिकाधिक स्पर्धात्मक अनुभव मिळतो आणि त्यातून राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडण्यास मदत होते, असे आवाहन त्यांनी केले.

उद्घाटक शीतल शिंदे यांनीही खेळाडूंना मार्गदर्शन करताना मेहनत, सातत्य आणि स्पर्धेतील सहभाग यामुळे निश्चितपणे यश मिळते, असे सांगितले. स्पर्धांमध्ये सातत्याने सहभागी होत राहण्याबरोबरच जिल्ह्यातील नामवंत व अनुभवी क्रीडा मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाचा खेळाडूंनी लाभ घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले.

You cannot copy content of this page