Headlines

हळवल-भाकरवाडीचा कमी दाबाचा प्रश्न मार्गी…

स्वतंत्र ट्रान्सफार्मर मंजूर:पंचायत समिती सदस्य लक्ष्मण गावडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश,पालकमंत्री नितेश राणे व आमदार प्रमोद जठार यांचे ग्रामस्थांकडून आभार..

⚡कणकवली ता.०७-: हळवल-भाकरवाडी परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्याच्या समस्येवर अखेर कायमस्वरूपी तोडगा निघाला आहे. या परिसरासाठी स्वतंत्र ट्रान्सफार्मर मंजूर करण्यात आला असून, त्यामुळे ग्रामस्थांना सुरळीत वीजपुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे हळवल-भाकरवाडी परिसरातील ग्रामस्थांना सातत्याने अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या दूर करण्यासाठी पंचायत समिती सदस्य लक्ष्मण गावडे यांनी संबंधित विद्युत विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. तसेच पालकमंत्री नितेश राणे आणि विधान परिषद आमदार प्रमोद जठार यांच्याकडेही सातत्याने पाठपुरावा करून स्वतंत्र ट्रान्सफार्मरची मागणी केली होती.

या पाठपुराव्याची दखल घेत पालकमंत्री नितेश राणे व आमदार प्रमोद जठार यांच्या माध्यमातून हळवल येथे स्वतंत्र ट्रान्सफार्मर मंजूर करण्यात आला आहे. या ट्रान्सफार्मरसाठी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हळवल-भाकरवाडी परिसरातील कमी दाबाचा वीजप्रश्न आता मार्गी लागला आहे.

स्वतंत्र ट्रान्सफार्मरमुळे परिसरातील वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार असून, ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे. या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल पंचायत समिती सदस्य लक्ष्मण गावडे तसेच सहकार्य केल्याबद्दल पालकमंत्री नितेश राणे व आमदार प्रमोद जठार यांचे हळवल-भाकरवाडीवासीयांनी आभार मानले आहेत.

You cannot copy content of this page