कुडाळ तालुक्यातील विविध शाळांना भेटी:शैक्षणिक गुणवत्ता व पायाभूत सुविधांची केली पाहणी..

⚡कुडाळ ता.०७-: महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागामार्फत राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘चला शाळेत जाऊया’ या विशेष अभियानांतर्गत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी ७ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी कुडाळ तालुक्यातील विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांची उपस्थिती तसेच शाळांमधील पायाभूत सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि मुख्याध्यापकांशी संवाद साधत शाळांच्या विविध अडचणी जाणून घेतल्या.
शिक्षणमंत्री भुसे यांनी सकाळी ८ वाजता पडतेवाडी येथील पांडुरंगशेठ पडते जि.प. प्राथमिक शाळेपासून शाळा भेटींच्या सत्राला सुरुवात केली. त्यानंतर कुडाळ हायस्कूल, बॅ. नाथ पै हायस्कूल (कुडाळ), एस. एल. देसाई विद्यालय (पाट) तसेच पावशी येथील जि.प. शाळा क्रमांक १ या शाळांना भेटी दिल्या.
या भेटीदरम्यान त्यांनी शाळांमधील उपलब्ध सुविधा, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, शिक्षकांच्या अडचणी तसेच स्थानिक पातळीवर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेतली. उत्कृष्ट उपक्रमांची राज्यातील इतर शाळांमध्ये अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने या भेटींना महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले.
एकही शाळा बंद पडू देणार नाही : दादा भुसे
पडतेवाडी येथील शाळेला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शिक्षणमंत्री दादा भुसे म्हणाले की, ‘चला शाळेत जाऊया’ हा उपक्रम गेल्या काही महिन्यांपासून राज्यभर प्रभावीपणे राबविला जात आहे. शिक्षणमंत्र्यांपासून केंद्रप्रमुखांपर्यंत सर्वांनी शाळांना भेटी देऊन स्थानिक पातळीवरील चांगले उपक्रम जाणून घेणे आणि शाळांसमोरील अडचणी तत्काळ सोडविणे, हा या अभियानाचा उद्देश आहे.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासोबतच शाळांमधील भौतिक सुविधांची पाहणी केली जात आहे. राज्यातील एकही शाळा बंद पडू दिली जाणार नाही, यासाठी शासन आवश्यक ती सर्व काळजी घेत आहे, असे भुसे यांनी स्पष्ट केले.
शाळा टिकविणे आणि विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविणे ही केवळ शासनाची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याबाबतचा निर्णय स्थानिक परिस्थितीचा विचार करून घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, एमपीएससी विद्यार्थ्यांशी संबंधित सुमारे ९० टक्के प्रश्न मुख्यमंत्री महोदयांनी सोडविले असून, उर्वरित कायदेशीर बाबींवरही सकारात्मक कार्यवाही सुरू आहे, असे दादा भुसे यांनी सांगितले.जिल्हा नियोजन समिती सभागृहात अभियानाचा आढावा
शाळा भेटींच्या सत्रानंतर दुपारी १ वाजता सिंधुदुर्गनगरी येथील ‘सिंधुनिती’ जिल्हा नियोजन समिती सभागृहात ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाची व्यापक आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीत जिल्ह्यातील शैक्षणिक प्रगती, शिक्षकांची उपलब्धता व रिक्त पदे, विद्यार्थ्यांची पटसंख्या तसेच शाळांमधील पायाभूत सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि जिल्ह्यातील शाळा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली.