हरी खोबरेकर यांची टीका:नाईक यांना विजयी करण्यासाठी आम्ही तन, मन, धन अर्पण करून काम करू..
मालवण (प्रतिनिधी)
आज आमच्या बद्दल काही अफवा व खोट्या बातम्या पसरविल्या जात आहेत, मात्र अशा अफवा पसरविल्यानंतर मला एकही फोन आला नाही. कारण महाविकास आघाडी आमचं कुटुंब आहे, हम साथ साथ है, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर असलेली निष्ठा, आम. वैभव नाईक यांच्याशी असलेले आमचे बंधुत्वाचे नाते अभेद्य आहे. अशा कितीही अफवा पसरविल्या तरी सर्व कार्यकर्त्यांचा आम. वैभव नाईक यांच्यावर विश्वास आहे. नाईक यांना विजयी करण्यासाठी आम्ही तन, मन, धन अर्पण करून काम करू, प्रसंगी आमचा प्राणही देऊ, नारायण राणे यांनी आमची चिंता करू नये, त्यांनी आपल्या मुलाची, ठेकेदारांची आणि दलालांची चिंता करावी, अशी टीका ठाकरे शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
मालवण येथील ठाकरे शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद झाली. त्यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, किरण वाळके, सन्मेष परब, दीपा शिंदे, नीनाक्षी मेतर, रश्मी परुळेकर, रुपा कुडाळकर, पायल आढाव, सिद्धेश मांजरेकर, सोनाली डिचोलकर आदी व इतर उपस्थित होते.
यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, नारायण राणे हे आता प्रखर हिंदुत्ववादी असल्या सारखे दाखवत आहेत. २००५ मध्ये राणे यांनी शिवसेना सोडली, नव्हे तर त्यांची बाळासाहेबांनी शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर राणेंनी काँग्रेस पक्ष का निवडला केला ? तेव्हा राणेंना हिंदुत्व आठवले नाही कां? तेव्हा भाजप पक्षही होता, तेव्हा भाजप आठवला नाही का ? तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर चालते, मात्र आम्ही सन्मानाने काँग्रेससोबत आघाडी केली तर राणे यांच्या पोटात दुखते हे लोकांना कळून चुकले आहे. ज्या नवाब मलिक यांच्यावर राणे यांनी आरोप केले, तेच नवाब मलिक उमेदवार म्हणून महायुती मधून लढत आहेत. तुम्ही मशीद मध्ये गेलात तर चालते, इफ्तार पार्टीत सहभागी होता ते चालते, त्याचे फोटो व्हायरल होतात, एकीकडे बुरखा घालायचा, एकीकडे बुरखा पांघरायचा असे करून राणे जनतेची दिशाभूल करत आहेत, आम्ही आमचं हिंदुत्व जपतोय, जो देशाभिमानी तो हिंदू ही शिवरायांची व बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आम्ही जपतोय, जाती जातीत तेढ निर्माण करण्याचे काम राणे करत असून त्यांचा बुरखा आम्ही फाडला आहे, असेही हरी खोबरेकर म्हणाले.
नारायण राणे हे घराणेशाही वाचविण्यासाठी आणि घराण्याचा विकास करण्यासाठी काम करत आहेत, राणे गुंडगिरी करत आहेत, दादागिरी करत आहेत हे लोकांना कळले आहे. आमचे आमदार वैभव नाईक सुसंस्कृत आहेत, सर्व सामान्यांना न्याय देण्यासाठी नाईक काम करत आहेत. आज तुमचे दोन मुलगे दोन वेगवेगळ्या चिन्हावर लढत आहेत, त्यांची दिशा कशा पद्धतीने चालली आहे ते आधी राणेंनी पाहावे, त्यानंतर आमच्या आमदारांवर टीका करण्याचे धाडस करावे असेही खोबरेकर म्हणाले.
वाळू व्यावसायिक आम. नाईक यांना पाठिंबा देण्यास सांगत असताना असताना नारायण राणे व कुटुंब सत्ता व प्रशासनाच्या आधारे वाळू व्यवसायिकांच्या विरोधात षडयंत्र करून त्यांच्यावर कारवाई करत आहेत. निवडून येण्यासाठी खालच्या पातळीचे राजकारण केले जात आहे. कोणाचे ठेकेदार, कोणाची माणसे याठिकाणी राणे यांची दलाली करत आहेत, कोणाचे नेते दलाली करतात हे ऑडिओ क्लिपच्या द्वारे सिद्ध झाले आहे. तुमची माणसे जागा विकायला, आयलंड विकायला जात आहेत, ठेकेदारीवरून कोणत्या नेत्याचे नाव घेऊन धमकावले जात आहे हे आता जनटा ओळखून आहे, त्यामुळे जनतेने मशाल चिन्हावार मतदान करण्याचे ठरवले आहे, असेही हरी खोबरेकर म्हणाले.
