Headlines

रतन टाटा यांचे शिल्प बनविले मडूरा पुत्र नितेश परीटने…

ड्यूश बँकेच्या मुंबई मुख्यालयात करण्यात आले अनावरण:नितेश यांच्या कलेचा बहुमान झाल्याने आईवडिलांनी व्यक्त केला आनंद..

⚡बांदा ता.०९-: ड्यूश बँकेने आपल्या बँकेच्या मुंबई मुख्यालयात उद्योगपती रतन टाटा यांच्या स्मरणार्थ त्यांच्या शिल्पचित्राचे नुकतेच अनावरण केले. टाटा उद्योग समूहाचे विद्यमान अध्यक्ष नोएल टाटा आणि ड्यूश बँकेचे जागतिक अध्यक्ष जेम्स वॉन मोल्टके यांच्या हस्ते या शिल्पचित्राचे अनावरण करण्यात आले. सदर शिल्पचित्र मडूरा (ता. सावंतवाडी) येथील नितेश प्रफुल्ल परीट या युवा कलाकाराने बनविले आहे. देशातील सर्वात मोठ्या टाटा उद्योग समूहाने नितेशच्या शिल्पकलेचा केलेला हा सर्वोच्च बहुमान असल्याची प्रतिक्रिया त्याच्या आईवडिलांनी दिली. नितेशच्या या सन्मानाबद्दल त्याचे जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे.

   ड्यूश बँकेचे सध्याचे मुख्यालय हे एकेकाळी टाटा कुटुंबीयांचे खाजगी निवासस्थान होते. उद्योगपती रतन टाटा आणि त्यांच्या भावंडांसह टाटा ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष नोएल टाटा यांचे बालपण याच इमारतीत गेले. टाटा कुटुंबाने सन १९९२ मध्ये टाटा हाऊस म्हणून ओळखले जाणारे निवासस्थान ड्यूश बँकेला विकले. या इमारतीत रतन टाटा यांच्या स्मरणार्थ त्यांचे शिल्पचित्र लावण्याचा निर्णय ड्यूश बँकेने घेतला होता. यासाठी टाटा उद्योग समूहाने नितेश परीट याने बनविलेल्या शिल्पचित्राची निवड केली.

रतन टाटा यांचे ९ ऑक्टोबर रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. त्याच दिवशी त्यांना श्रद्धांजली म्हणून नितेशने त्यांचे छोटे शिल्पचित्र बनविले. सदर शिल्पचित्र सोशल मीडियावरून व्हायरल झाले. याची दखल खुद्द नोएल टाटा यांनी घेतली आणि नितेशला मुख्य कार्यालयात बोलावून त्यांनी रतन टाटा यांचे मोठे शिल्प बनविण्याची जबाबदारी दिली. नीतेशने बनविलेले शिल्पचित्र टाटा कुटुंबीयांना खूपच भावले. त्यांनी ते चित्र कुटुंबाच्या आठवणी ज्या इमारतीत आहेत त्या जागेत लावण्याचे ठरविले. ड्यूश बँकेनेही रतन टाटा यांच्या सन्मानार्थ सदर शिल्पचित्र मुख्य कार्यालयात लावण्याचा निर्णय घेतला.

शिल्पचित्र अनावरण सोहळ्याला ड्यूश बँकेचे जागतिक अध्यक्ष जेम्स वॉन मोल्टके यांच्यासह बँकेचे संचालक, वरिष्ठ पदाधिकारी, टाटा समूहाचे अध्यक्ष नोएल टाटा व कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नितेशने यापूर्वी माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे, उस्मानाबादचे पहिले आयपीएस अधिकारी शिवाजी सोनावणे तसेच प्रसिद्ध कीर्तनकार पार्वतीबाई सातकर यांची शिल्पचित्र बनविली आहेत.

चौकट
माझ्या कलेचा मोठा सन्मान : नितेश परीट
   उद्योगपती रतन टाटा यांच्याबद्दल आधीपासूनच प्रचंड आदर होता. टाटा उद्योग समूहाने शिल्पचित्र बनविण्यास सांगितल्याने माझ्यासाठी ते मोठे आव्हान होते. आईवडील, काका यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पचित्र तयार केले. टाटा समूहाने माझ्या कलेचा केलेला हा माझा मोठा सन्मान आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया नितेश परीट यांनी दिली.

चौकट
मडुरा गावासाठी भूषणावह : संजू परब
     नितेश हा हुशार व मेहनती युवक आहे. शिल्पकला शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्याने बरीच मेहनत घेतली. काका शशिकांत परीट यांच्या समवेत गणेशमूर्ती बनविताना त्याच्या कलेचे पडसाद मूर्तीमध्ये दिसायचे. देशातील सर्वात मोठ्या टाटा उद्योग समूहाने त्याच्या शिल्पचित्राचा केलेला सन्मान माझ्या मडूरा गावासाठी भूषणावह आहे. लवकरच त्याचा गावातर्फे भव्य सत्कार करण्यात येणार असल्याचे सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी सांगितले.

You cannot copy content of this page