तौकीर शेख यांचा खळबळजनक आरोप:
मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमधील सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स तपासण्याची मागणी: तर गाळे संदर्भातचा अहवाल पुढच्या बैठकीत सादर करतो, मुख्याधिकारी..
⚡सावंतवाडी ता.०९-: पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील भ्रष्टाचार प्रकरणात गुन्हा दाखल असलेला जोडारी भारत लाखे हा दोषी नसून यामध्ये मुख्याधिकारीच खरे दोषी आहेत, त्यांचा या भ्रष्टाचारामध्ये सहभाग असून आपल्याकडे याबाबत कॉल रेकॉर्डिंगचा पुरावा आहे असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे नगरसेवक तौकीर शेख यांनी आज पालिकेच्या मासिक बैठकीत करत मुख्याधिकारी यांच्या केबिनमधील सीसीटीव्ही फुटेज आणि त्यांचे कॉल डिटेल्स हे तपासा अशी मागणी सभागृहाकडे केली. तर बैठकीच्या सुरुवातीलाच शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांनी पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांच्या राजीनाम्याची मागणी करत सभात्याग केला.
सावंतवाडी नगरपालिकेची मासिक बैठक आज नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, मुख्याधिकारी विनायक औंधकर उपस्थित होते.
या सभेमध्ये विविध विकासकामांवर चर्चा करत निर्णय घेण्यात आले. सभेच्या सुरुवातीलाच शिंदे शिवसेनेचे नगरसेवक संजू परब यांनी मागील सभेमध्ये पाणीपुरवठा सभापतींच्या राजीनाम्यासंदर्भात केलेल्या मागणीची नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांना विचारणा केली. यावर सभागृहात गोंधळ उडाला. मात्र शिंदे शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी या विषयाला धरून सभात्याग करत निषेध नोंदवला. त्यांच्या या कृतीवर नगराध्यक्ष श्रद्धा भोसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी नाराजी व्यक्त केली. तर सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी कायदेशीररित्या संबंधित नगरसेवकांवर कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात यावी अशी सूचना उपनगराध्यक्ष ॲड. निरवडेकर यांनी प्रशासनाला केली. तर असला प्रकार यापुढे खपवून घेतला जाणार नाही असा इशारा नगराध्यक्षा भोसले यांनी दिला. ज्यावेळी महत्त्वाचे विषय असतात अशावेळी हे पळून जातात असा आरोपही आरोग्य सभापती सुधीर आडीवडेकर यांनी केला.
दरम्यान अस्तित्वात असलेल्या इंदिरा गांधी व्यापारी संकुलामध्ये एकाच व्यक्तीच्या नावे दोनपेक्षा अधिक गाळे देण्यावरून श्रेयस मुंज यांनी केलेल्या तक्रारीवर सभागृहामध्ये झालेल्या चर्चेत सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरले. एकाच कुटुंबाला दोनपेक्षा अधिक गाळे न देण्याबाबत कायदाच असताना आपण सील केलेले गाळे परस्पर संबंधित व्यक्तीला कसे काय दिले अशी विचारणा आरोग्य सभापती सुधीर आडीवडेकर व नगरसेवक सिद्धार्थ भांबरे यांनी केली. याला विरोधी नगरसेवक तौकीर शेख व देवा टेमकर यांनी साथ दिली. दरम्यान आपण या संदर्भात सखोल अभ्यास करून आलो नाही असे उत्तर देत या विषयाला बगल देण्याचा प्रयत्न मुख्याधिकाऱ्यांनी केला. तर पुढच्या बैठकीपूर्वी यासंदर्भात सविस्तर अहवाल सभागृहाकडे सादर करतो असे सांगितले. यावर उपनगराध्यक्ष ॲड. निरवडेकर यांनी सदर अहवाल सादर करताना प्रत्येक मुद्द्यानुसार तो देण्यात यावा असे सुचित केले, शिवाय सील केलेले गाळे पुन्हा उघडताना नेमके कोणते अधिकारी होते याची माहितीही त्यात नमूद करा असे सांगितले.
राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती पाहता शहरातील पाण्याचे योग्य नियोजन करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. यामध्ये नगरसेवक देवा टेमकर यांनी शहरात वापरात नसलेल्या विहिरी साफ करून त्याचे पाणी वापरायोग्य करण्याची मागणी केली, तर आरोग्य सभापती सुधीर आडीवडेकर यांनी शहरात तीन नैसर्गिक स्रोतांवर बंधारे उभारण्याची मागणी केली. यावर उत्तर देताना नगराध्यक्षांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडून खास करून भाजपचे नगराध्यक्ष असलेल्या नगरपालिकांना पाण्याच्या नियोजनासाठी १० लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे, त्यातून शहरातील पाण्याचे योग्य नियोजन केले जाणार असल्याचे सांगितले. तर ज्या ठिकाणी पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे त्या ठिकाणी काटकसर केली जाणार आहे. तर नळ कनेक्शनला मोटर पंप लावून पाणी वापरणाऱ्या ग्राहकाला पहिल्यांदा ५ हजार रुपये दंड आणि दुसऱ्यांदा आढळल्यास १० हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
शहरातील उद्यानामध्ये उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतराचा मक्ता रद्द करण्याबाबतचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. नव्याने या कामासंदर्भात निर्णय घेण्यात येईल असे मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यावेळी देवा टेमकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे दैवत असून सदर नव्याने होणारे काम लवकरात लवकर व्हावे अशी मागणी केली. तर सुधीर आडीवडेकर यांनी शहरात मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा जेणेकरून पर्यटनाला चालना मिळेल अशी मागणी केली. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळाही शहरात उभारण्यात यावा, त्याचा विचार व्हावा अशी मागणी नगरसेवक आनंद नेवगी यांनी केली.
तर शहरातील मोती तलावामध्ये बोटिंग प्रकल्प सुरू करण्यासाठी विचार करण्यात आला. यावेळी नगरसेवक आनंद नेवगी यांनी सदर प्रकल्प सुरू करताना ज्याच्याकडे हा प्रकल्प चालवण्यासाठी देण्यात येईल त्याच्याकडे मेरीटाईम बोर्डाचे लायसन्स असावे तसेच अटी व शर्ती घालून हा प्रकल्प सुरू करण्यात यावा असे सांगितले. तर तलावातील दूषित झालेले पाणी आणि नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेता शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन तलाव संवर्धनासाठी प्रशासनाने पावले उचलावीत, तसेच तज्ज्ञ व्यक्तींना बोलवून तलावातील पाणी स्वच्छ करण्याबाबत निर्णय घेण्यात यावा अशी मागणी नगरसेवक प्रतीक बांदेकर यांनी केली.
संत गाडगेबाबा भाजी मंडईतील विस्थापित विक्रेत्यांकडून प्रति महिना ४ हजार रुपये भाडे निश्चिती करून भाडे वसुली करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

